चिली : जगातील सर्वात कोरड्या समजल्या जाणार्या अटाकामा वाळवंटात नुकतीच दुर्मीळ हिमवृष्टी झाली आहे. यामुळे येथील एएलएमए (अटाकामा लार्जमिलिमीटर, सबमिलीमीटर अॅरे) या जगप्रसिद्ध रेडिओ दुर्बिणीच्या कार्यात अडथळा निर्माण झाला आहे. 26 जून रोजी झालेल्या या हिमवृष्टीमुळे एएलएमए वेधशाळेच्या बेस कॅम्पवर बर्फाची चादर पसरली आणि सर्व वैज्ञानिक कामकाज तात्पुरते थांबवावे लागले.
अटाकामा वाळवंटात वर्षभरात केवळ 1 ते 15 मिलिमीटर पर्जन्यवृष्टी होते, आणि अनेक भागात वर्षानुवर्षे पाऊस किंवा बर्फ पडत नाही. मात्र, यंदा बेस कॅम्पवर दहा वर्षांनंतर प्रथमच हिमवृष्टी झाली. एएलएमए वेधशाळा समुद्रसपाटीपासून 2,900 मीटर उंचीवर वसलेली आहे. येथे वर्षातून साधारणपणे तीन वेळा बर्फ पडतो; परंतु बेस कॅम्पवर इतक्या प्रमाणात हिमवृष्टी दुर्मीळ आहे.
या अनपेक्षित हवामान बदलामुळे वेधशाळेतील सर्व उपकरणे ‘सर्व्हायव्हल मोड’मध्ये ठेवण्यात आली आहेत. हवामान तज्ज्ञांच्या मते, हवामान बदलामुळे अशा घटना भविष्यात वाढू शकतात. सध्या हिमवृष्टी थांबली असली, तरी वैज्ञानिक कामकाज पुन्हा सुरू होण्यासाठी परिस्थिती सामान्य होण्याची प्रतीक्षा केली जात आहे. या घटनेमुळे जागतिक स्तरावर हवामान बदल आणि त्याचा विज्ञान संशोधनावर होणारा परिणाम याबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.