सॅन होजे : कोस्टा रिकाच्या कॅरिबियन समुद्रात मासेमारी करणार्यांना एक अत्यंत दुर्मीळ आणि आश्चर्यकारक असा एक चमकदार ऑरेंज(नारंगी) कलरचा शार्क सापडला आहे, ज्याच्या डोळ्यांचा रंग पांढरा आहे. या शार्कची ही दुर्मीळ स्थिती ‘अल्बिनिझम’ आणि ‘झॅन्थिजम’ या दोन आनुवंशिक स्थितींमुळे असल्याचा शोध संशोधकांनी लावला आहे.
सामान्यपणे, नर्स शार्कचा रंग पिवळसर ते राखाडी-तपकिरी असतो. परंतु, या शार्कचा रंग पूर्णपणे ऑरेंज(नारंगी) सारखा आहे. कारण, त्याच्या त्वचेमध्ये ‘झॅन्थिजम’ नावाच्या दुर्मीळ स्थितीमुळे पिवळ्या रंगाचे रंगद्रव्य जास्त प्रमाणात तयार झाले आहे. यामुळे हा शार्क ऑरेंज(नारंगी) कलरमध्ये चमकत आहे. यासोबतच, त्याच्या डोळ्यात आणि त्वचेत ‘अल्बिनिझम’मुळे मेलेनिन या रंगद्रव्याची पूर्णपणे कमतरता आहे. त्यामुळे त्याचे डोळे पांढरे दिसत आहेत. अशा प्रकारे, एकाच जीवात दोन्ही दुर्मीळ आनुवंशिक स्थिती आढळण्याची ही पहिलीच वैज्ञानिक नोंद आहे.
गेल्या वर्षी, एका हॉटेल मालकाला आणि त्याच्या साथीदारांना मासेमारी करताना हा अनोखा शार्क समुद्रात 37 मीटर खोल मिळाला. त्यांनी या शार्कचे फोटो काढले आणि नंतर त्याला पुन्हा समुद्रात सोडून दिले. या फोटोंच्या आधारावर संशोधकांनी ‘मरीन बायोडायव्हर्सिटी’ या जर्नलमध्ये या शोधाचे महत्त्व प्रकाशित केले आहे. वैज्ञानिक म्हणतात की, या दोन दुर्मीळ स्थितींमुळे शार्कचा रंग असा झाला आहे. सहसा, अशा वेगळ्या रंगामुळे नैसर्गिक वातावरणात शिकारीपासून स्वतःचे संरक्षण करणे किंवा शिकार करणे कठीण होते. तरीही, हा ऑरेंज कलरचा शार्क प्रौढावस्थेपर्यंत पोहोचला आहे, हे एक आश्चर्य आहे. त्याचे या असामान्य रंगासह जगणे हे पर्यावरण आणि त्याच्या आनुवंशिक स्थितीबद्दल अधिक अभ्यास करण्याची संधी देते. हा शोध सागरी जीवशास्त्रात एक नवीन आणि महत्त्वाचा मानला जात आहे.