रोमन काळातील सोन्याचे ब्रेसलेट सापडले. Pudhari File Photo
विश्वसंचार

कुत्र्याला फिरवताना मुलाला सापडले प्राचीन ब्रेसलेट

हे ब्रेसलेट इसवी सनाच्या पहिल्या शतकातील

अरुण पाटील

लंडन : इंग्लंडमध्ये बारा वर्षांचा एक मुलगा आपल्या आईसमवेत कुत्र्याला फिरवण्यासाठी गेला असताना त्याला रोमन काळातील सोन्याचे ब्रेसलेट सापडले. हे ब्रेसलेट इसवी सनाच्या पहिल्या शतकातील आहे. रोमन काळातील अन्य दागिन्यांप्रमाणे हे ब्रेसलेट एखाद्या महिलेचे नसून ते पुरुषाचे असावे असे संशोधकांना वाटते.

हे कडे म्हणजे त्या काळातील हे एक शौर्यपदकच

या पुरुषाला सैन्यातील कामगिरीबाबत मिळालेले ते मानाचे कडे असावे, असा अंदाज आहे. त्या काळातील हे एक शौर्यपदकच आहे. रोमन काळातील ब्रिटनमधील हे एक दुर्मीळ व अपवादात्मक कडे आहे. याबाबतची माहिती स्थानिक चिचेस्टर डिस्ट्रिक्ट कौन्सिलने दिली आहे. रोवन नावाचा मुलगा आपली आई अ‍ॅमांडा ब्रानन हिच्यासमवेत फिरण्यासाठी गेला होता. वेस्ट ससेक्समधील पाघम हे त्याचे गाव. किनारपट्टीवरील या गावातच त्याला हे दुर्मीळ कडे सापडले. त्यांनी हे कडे पोर्टेबल अँटीक्वीटीज स्कीममधील एका स्थानिक अधिकार्‍याला दाखवले. इंग्लंडमध्ये लोकांना सापडलेल्या प्राचीन व दुर्मीळ वस्तूंची नोंद घेण्यासाठी ब्रिटिश म्युझियमने सुरू केलेला हा प्रकल्प आहे. या ब्रेसलेटवर नंतर संशोधन करण्यात आले व ते इसवी सनाच्या पहिल्या शतकातील असल्याचे निष्पन्न झाले. रोमन सम्राट क्लॉडियस याने इसवी सन 43 मध्ये ब्रिटनवर आक्रमण केले होते. त्यानंतरच्या काळातील हे कडे आहे. हे सोन्याचे कडे तीन इंच म्हणजेच 7.1 सेंटिमीटर लांबीचे आहे. ते सरळ करून लांबवले तर त्याची लांबी अधिक होईल. ते सैन्यातील कामगिरीबद्दल बक्षीस म्हणून दिल्या जाणार्‍या कड्यांसारखे आहे. ब्रिटनवरील हल्ल्याच्या काळात शौर्य गाजवलेल्या एखाद्या सैन्यातील वीराला हे बक्षीस दिले गेले असावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT