वॉशिंग्टन : आकाशाच्या पटलावर शुक्रवारी सात ग्रहांनी जणू काही परेड केली. या ‘प्लॅनेट परेड’ म्हणजेच ग्रहांच्या एका रेषेत येण्याच्या दुर्मीळ खगोलीय घटनेचे द़ृश्य कॅमेरामध्ये कैद केले गेले आहे. ‘स्टारमॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या 27 वर्षीय छायाचित्रकार जोश ड्युरी यांनी पृथ्वीसह सर्व सात ग्रहांचे एकाच फ्रेममध्ये पहिले छायाचित्र घेतले आहे.
याआधी अशी घटना 1982 मध्ये दिसून आली होती. याचा अर्थ आता 40 वर्षांहून अधिक काळानंतर ती प्रथमच पाहायला मिळाली. जोश ड्युरी यांनी समरसेटच्या मेंडिप हिल्समधून या प्लॅनेट परेडचे छायाचित्र घेऊन इतिहास रचला आहे. ड्युरी यांनी बुध, शनी आणि नेपच्युन यांसारख्या अस्पष्ट दिसणार्या ग्रहांना कैद करण्यासाठी खास तंत्रज्ञानाचा वापर केला. यासाठी त्यांनी अनेक पॅन जोडून एक पॅनोरामिक प्रतिमा तयार केली. या तीन ग्रहांचे स्पष्ट छायाचित्र मिळवण्यासाठी दोन वेगवेगळ्या एक्स्पोजर तंत्राचा वापर केला. एक सामान्य एक्स्पोजर आणि दुसरा जास्त एक्स्पोजर, ज्यामुळे धूसर ग्रहांची क्षीण प्रकाश किरणेही स्पष्ट पकडली जाऊ शकतील. ग्रहांच्या स्थितीची खात्री करण्यासाठी त्यांनी प्लॅन स्फेअर मॅप्सची तुलना केली. ड्युरी यांनी सांगितले, मी सात ग्रहांची एक पॅनोरमा प्रतिमा घेतली, जी प्लॅनेटरी परेड म्हणून ओळखली जाते. ही नऊ छायाचित्रांपासून तयार करण्यात आली आहे. शनी, बुध आणि नेपच्युन हे ग्रह स्पष्ट दिसत नाहीत म्हणून मी त्यांच्या स्थानाची खात्री करण्यासाठी इमेज अॅनालिसिस आणि खगोलशास्त्रीय अॅप्सचा वापर केला. हे छायाचित्र वाईड-अँगल लेन्सने घेतल्याने नऊ छायाचित्रे जोडून पॅनोरामा तयार केला गेला. यामध्ये एकाच फ्रेममध्ये एचडीआर ब्लेंड केले गेले, ज्यामुळे शनी, नेपच्युन आणि बुध स्पष्ट दिसू शकतील. या परेडमध्ये शुक्र, मंगळ, गुरू आणि युरेनस हे उघड्या डोळ्यांनी सहज पाहता येतात. मात्र, बुध, शनी आणि नेपच्युन हे अत्यंत धूसर असल्याने त्यांना पाहण्यासाठी उच्च क्षमतेच्या दुर्बिणीची आवश्यकता असते.