न्यूयॉर्क : तुम्ही कधी नारंगी रंगाचा शार्क मासा पाहिला आहे का? ऐकायला विचित्र वाटलं तरी, जगातील एका समुद्र किनारपट्टीवर हा शार्क मासा आढळला आहे. या शार्क माशाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. कारण आजवर आपण पाहिलेल्या शार्कचा रंग आणि या शार्कचा रंग हा पूर्णपणे वेगळा आहे. या नारंगी शार्कचे फोटो पाहून शास्त्रज्ञदेखील चकित झाले आहेत. अनेकांना प्रश्न पडला आहे की हा नारंगी रंगाचा शार्क मासा नेमका कुठे सापडला आहे? चला जाणून घेऊया :
अलीकडेच प्रकाशित झालेल्या ‘मरीन बायोलॉजी जर्नल’ या विज्ञान मासिकाच्या अहवालानुसार, नारंगी रंगाचा हा पहिला शार्क ऑगस्ट 2024 मध्ये कोस्टा रिकाच्या टॉर्टुग्वेरो नॅशनल पार्कमध्ये दिसला होता. तेव्हा काही मच्छीमारांनी समुद्राच्या 37 मीटर खोलीत या नारंगी शार्कला पाहिले होते, जो सामान्य शार्कपेक्षा पूर्णपणे वेगळा होता. त्याचे डोळे पांढरे होते आणि शरीर चमकदार नारंगी रंगाचे होते.
मच्छीमारांनी तातडीने शार्कची छायाचित्रे काढली आणि नंतर त्याला पुन्हा पाण्यात सोडले. नंतर जेव्हा या दुर्मीळ नारंगी शार्कची छायाचित्रे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर शेअर केली गेली, तेव्हा ती झटपट व्हायरल झाली. नेटकर्यांना ती पाहून आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यांनी त्याला ‘गोल्डफिश’ शार्क असे नाव देण्यास सुरुवात केली. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, या शार्कचा हा खास रंग दोन अत्यंत दुर्मीळ अनुवांशिक परिस्थितींमुळे आहे. पहिली म्हणजे अल्बिनिझम (Albinism), ज्यामुळे प्राण्याची त्वचा आणि डोळ्यांचा रंग हलका होतो.
दुसरी म्हणजे झँथिझम (Xanthism), ज्यामुळे प्राण्याची त्वचा किंवा खवले पिवळ्या-नारंगी रंगाचे दिसतात. संशोधकांच्या मते, या दोन्ही अनुवांशिक परिस्थितींमुळे शार्कच्या शरीरात मेलॅनिनचे उत्पादन योग्य प्रकारे होऊ शकले नाही आणि यामुळेच त्याच्या शरीराचा रंग तपकिरी किंवा निळ्याऐवजी चमकदार नारंगी झाला. शास्त्रज्ञांनी सांगितले की, हा एक सामान्य नर शार्क होता, फक्त त्याचा रंग अनोखा आहे, पण हा रंग त्याच्यासाठी धोकादायकही ठरू शकतो, कारण समुद्राच्या खोलवर हा चमकदार रंग शिकारी प्राण्यांना सहजपणे आकर्षित करू शकतो.