Congo mountain gorilla twins | काँगोमध्ये दुर्मीळ पर्वतीय गोरिलाच्या जुळ्यांचा जन्म 
विश्वसंचार

Congo mountain gorilla twins | काँगोमध्ये दुर्मीळ पर्वतीय गोरिलाच्या जुळ्यांचा जन्म

संवर्धनासाठी काम करणार्‍यांना नवी आशा

पुढारी वृत्तसेवा

किंशासा : आफ्रिकेतील दुर्मीळ आणि संकटग्रस्त प्रजाती असलेल्या पर्वतीय गोरिलांच्या जुळ्यांचा जन्म झाल्याने वन्यजीव संवर्धन क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमधील विरुंगा नॅशनल पार्क येथे नववर्षाच्या सुरुवातीलाच ही दुर्मीळ घटना घडली. पार्कमधील वन्यजीवांवर लक्ष ठेवणार्‍या कम्युनिटी ट्रॅकर्सनी 3 जानेवारी रोजी या जुळ्या नर गोरिलाच्या पिलांना पाहिले. अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, निरीक्षणाच्या वेळी दोन्ही पिले निरोगी दिसत होती.

विरुंगा नॅशनल पार्कमधील पर्यावरण निरीक्षण अधिकारी जॅक कातुतु म्हणाले, ‘पर्वतीय गोरिलांमध्ये जुळ्यांचा जन्म अतिशय दुर्मीळ असतो आणि तो नेहमीच जगण्याच्या द़ृष्टीने मोठे आव्हान ठरतो. आम्ही सावध आहोत, सतर्क आहोत; पण आशाही ठेवली आहे. पहिले चार आठवडे अत्यंत महत्त्वाचे असतात.’

22 वर्षांची माफुको ठरली जुळ्यांची आई

या जुळ्यांची आई म्हणजे 22 वर्षांची माफुको. आतापर्यंत ती एकूण सात पिलांना जन्म देणारी अनुभवी गोरिला माता आहे. माफुको ही पार्कमधील बागेनी कुटुंबाची सदस्य असून, या कुटुंबात आता 59 गोरिला आहेत. त्यामुळे हे कुटुंब आफ्रिकेतील सर्वात जुन्या राष्ट्रीय उद्यानातील सर्वात मोठे पर्वतीय गोरिला कुटुंब ठरले आहे.

पर्वतीय गोरिलांची वैशिष्ट्ये

पूर्व आफ्रिकन गोरिलांची उपप्रजाती असलेले पर्वतीय गोरिला 8 हजार ते 13 हजार फूट उंचीवरील जंगलांमध्ये राहतात. थंड हवामानामुळे त्यांचे केस दाट आणि जाड असतात. त्यांचे वजन 200 किलोंपर्यंत जाऊ शकते, तर उंची साधारण साडेपाच फुटांपर्यंत असते.

विरुंगा पार्क गोरिलांचे सुरक्षित आश्रयस्थान

विरुंगा नॅशनल पार्कमध्ये सध्या सुमारे 350 पर्वतीय गोरिला आहेत. जगभरात एकूण अंदाजे 1,075 पर्वतीय गोरिला शिल्लक असून ते काँगोसोबतच रवांडा आणि युगांडामध्येही आढळतात.

नामशेष होण्याच्या उंबरठ्यावरून पुनरुज्जीवन

1980 च्या दशकाच्या सुरुवातीला युद्ध, शिकार आणि मानवी हस्तक्षेपामुळे पर्वतीय गोरिलांची संख्या 250 पेक्षाही कमी झाली होती. एकेकाळी ही प्रजाती पूर्णपणे नष्ट होईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र, गेल्या सुमारे चार दशकांत सतत आणि कठोर संवर्धन प्रयत्नामुळे त्यांची संख्या पुन्हा हजाराच्या पुढे गेली. याच यशामुळे 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेने या प्रजातीचा दर्जा ‘क्रिटिकली एंडेंजर्ड’ वरून ‘एंडेंजर्ड’ असा बदलला. या पार्श्वभूमीवर, विरुंगा नॅशनल पार्कमधील जुळ्या गोरिलांचा जन्म हा केवळ आनंदाची बातमी नाही, तर संवर्धन प्रयत्नांना मिळालेली मोठी प्रेरणा मानली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT