Triple Birth Same Date | एकाच तारखेला जन्मली तीन मुले 
विश्वसंचार

Rare Birth Incident | एकाच तारखेला जन्मली तीन मुले

प्रसूती करणाऱ्या डॉक्टरचाही वाढदिवस त्याचदिवशी

पुढारी वृत्तसेवा

चेन्नई : आजकालचे कपल्स विचारपूर्वक कुटुंब नियोजनाचा (फॅमिली प्‍लॅनिंग) निर्णय घेतात, त्‍यामध्‍ये मानसिक आणि आर्थिक तयारीचा प्रामुख्याने विचार केला जातो. परंतु, भारतामधील एका कुटुंबाने नियोजनाचा असा काही अनोखा विक्रम केला आहे, जो पाहून भल्याभल्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या कुटुंबातील तीन मुलांचा जन्म वेगवेगळ्या वर्षांत झाला असला, तरी त्यांची जन्मतारीख मात्र एकच म्हणजे १० जून आहे. याहून विशेष म्हणजे, या तिन्ही मुलांची प्रसूती करणाऱ्या महिला डॉक्टरचा वाढदिवसही त्याच दिवशी म्हणजेच १० जूनला असतो. हा दुर्मीळ संयोग सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरला आहे. तामिळनाडूतील पालायमकोट्टई येथील या कुटुंबात हा निसर्गाचा अद्‌भूत चमत्कार पाहायला मिळाला.

कसा घडला हा अद्‌भूत संयोग?

या कुटुंबात पहिल्या अपत्याचा जन्म १० जून रोजी झाला. तेव्हा कुटुंबाला हा एक सामान्य योगायोग वाटला. काही वर्षांनंतर दुसऱ्या मुलाचा जन्मही अगदी त्याच तारखेला म्हणजे १० जून रोजी झाल्याने सर्वजण थक्क झाले. तिसऱ्या बाळंतपणाच्या वेळी तर संपूर्ण कुटुंब आणि हॉस्पिटलचा कर्मचारी वर्ग उत्सुकतेने वाट पाहत होता. आश्चर्य म्हणजे तिसऱ्या बाळानेही १० जून रोजीच जगात पाऊल ठेवले. या तिन्ही बाळांची प्रसूती करणाऱ्या डॉक्टर रामोला जेनेट डायना यांचा वाढदिवस कधी आहे, असे विचारले असता, तोदेखील १० जूनच असल्याचे समोर आले.

डॉक्टर काय म्हणाल्या?

डॉ. रामोला जेनेट डायना यांनी सांगितले की, "माझ्या संपूर्ण वैद्यकीय कारकिर्दीत मी हजारो प्रसूती केल्या आहेत, परंतु असा अद्‌भूत संयोग कधीही पाहिला नाही. या तिन्ही प्रसूती नैसर्गिक होत्या, यासाठी कोणतेही वैद्यकीय नियोजन किंवा प्री-प्लॅनिंग केले नव्हते. हा निव्वळ निसर्गाचा खेळ आणि ईश्वरी संकेत आहे."

ही बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर 'परफेक्ट फॅमिली प्लॅनिंग' म्हणून या कुटुंबाचे कौतुक होत आहे. एका यूजरने "याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली पाहिजे," अशी कमेंट केली, तर दुसऱ्याने विनोद करत लिहिले, "आता या कुटुंबाचा वाढदिवसाचा खर्च खूप वाचणार आहे!" नकारात्मक बातम्यांच्या गराड्यात ही आनंददायी आणि सकारात्मक बातमी देशभरात वेगाने व्हायरल होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT