बीजिंग : चीनमध्ये आढळलेल्या एका चार पंख असलेल्या आणि पक्षांसारख्या दिसणाऱ्या हिंस्त्र डायनासोरमुळे, वेगवेगळ्या डायनासोर प्रजातींमध्ये उडण्याची क्षमता एकापेक्षा जास्त वेळा स्वतंत्रपणे उत्क्रांत झाली असावी या सिद्धांताला नवा भक्कम पुरावा मिळाला आहे. अत्यंत सुस्थितीत सापडलेल्या या डायनासोरचे नाव ‘नोरेलराप्टर बार्सबोल्डी’ (Norellraptor barsboldi) असे ठेवण्यात आले आहे. मृत्यूसमयी या डायनासोरचे वय ३ वर्षे होते आणि त्याची लांबी अवघी २१ इंच (५७ सेंटीमीटर) होती. ईशान्य चीनमधील सुमारे १४ कोटी ५० लाख ते १० कोटी वर्षांपूर्वीच्या (प्रारंभिक क्रेटेशिअस काळातील) ‘ज्युफोटांग फॉर्मेशन’ भागात हे जीवाश्म आढळले आहे.
या अभ्यासात थेट सहभागी नसलेले युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन-मॅडिसन येथील कशेरुक जीवाश्मतज्ज्ञ स्कॉट हार्टमन यांनी सांगितले की, ‘नोरेलराप्टरच्या तोंडात तीक्ष्ण वळणदार दात आणि पायांना तीक्ष्ण नखे होती, जे एका लहान आणि चपळ शिकारी प्राण्याचे वैशिष्ट्य आहे. हा प्राणी बहुतेकदा सुरुवातीचे सस्तन प्राणी, सरडे, उभयचर प्राणी आणि लहान डायनासोरची पिल्ले खात असावा. हा मोठ्या डायनासोरवर हल्ला करण्याची शक्यता अजिबात नव्हती. ते म्हणजे एखाद्या युद्धनौकेवर डासाने हल्ला करण्यासारखे झाले असते.’ ‘नोरेलराप्टर बार्सबोल्डी’ हा मायक्रोराप्टर कुळातील होता. मायक्रोराप्टर हे पक्षांचे जवळचे नातेवाईक मानले जातात, परंतु ते पक्षांचे थेट पूर्वज नाहीत.
पक्षी हे ‘एव्हियाले’ या शेजारील कुळात मोडतात. सुमारे १५ कोटी वर्षांपूर्वीच्या ‘आर्किओप्टेरिक्स’ (Archaeopteryx) या सुरुवातीच्या पक्षांसारख्या प्राण्यांप्रमाणेच मायक्रोराप्टरच्या अंगावरही पिसे होती, हे जीवाश्मांवरून स्पष्ट होते. मात्र, उडण्याची क्षमता ही या दोन्ही कुळांच्या एकाच सामायिक पूर्वजापासून आली की पिसे आणि उडण्याची कला वेगवेगळ्या प्रजातींमध्ये स्वतंत्रपणे विकसित झाली? हा शास्त्रज्ञांसमोरील मोठा प्रश्न होता. इटलीतील ‘ओफिस पॅलिओन्टॉलॉजिकल म्युझियम अँड हर्पेटॉलॉजिकल सेंटर’चे जीवाश्मतज्ज्ञ अँड्रिया काऊ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या या संशोधनामुळे हा बदल एकापेक्षा जास्त वेळा स्वतंत्रपणे झाला असावा या सिद्धांताला बळ मिळाले आहे. संशोधकांच्या विश्लेषणात असे दिसून आले की, मायक्रोराप्टरच्या उत्क्रांतीदरम्यान शरीरात झालेल्या १९४ शारीरिक बदलांपैकी सुमारे ३० टक्के बदल हे पक्षांच्या कुळातही स्वतंत्रपणे विकसित झाले होते.