Flat Headed Cat | 30 वर्षांनंतर थायलंडमध्ये दिसले दुर्मीळ ‘फ्लॅट-हेडेड’ मांजर File Photo
विश्वसंचार

Flat Headed Cat | 30 वर्षांनंतर थायलंडमध्ये दिसले दुर्मीळ ‘फ्लॅट-हेडेड’ मांजर

पुढारी वृत्तसेवा

बँकॉक : थायलंडमधील वन्यजीव प्रेमींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या 30 वर्षांपासून थायलंडमधून नामशेष मानल्या जाणार्‍या एका अतिशय दुर्मीळ मांजराचे दर्शन संशोधकांना झाले आहे. ‘फ्लॅट-हेडेड कॅट’ असे या प्रजातीचे नाव असून, हे मांजर दिसायला अत्यंत गोंडस आहे.

‘प्रिओनेल्युरस प्लॅनिसेप्स’ (Prionailurus planiceps) असे शास्त्रीय नाव असलेले हे मांजर प्रामुख्याने ब्रुनेई, इंडोनेशिया आणि मलेशियामध्ये आढळते. मात्र, थायलंडमध्ये 1995 नंतर ते कधीही दिसले नव्हते. 2024 आणि 2025 दरम्यान थायलंडच्या ‘प्रिन्सेस सिरिंधोरन वन्यजीव अभयारण्यात’ बसवण्यात आलेल्या रिमोट कॅमेरा ट्रॅपमध्ये ही मांजरं कैद झाली आहेत. ‘पँथेरा’ या वन्यजीव संवर्धन संस्थेने शुक्रवारी (26 डिसेंबर), थायलंडच्या ‘राष्ट्रीय वन्यजीव संरक्षण दिना’निमित्त ही घोषणा केली. थायलंडचे नैसर्गिक संसाधने आणि पर्यावरणमंत्री सुचार्ट चोमक्लिन यांनी यावर आनंद व्यक्त करताना म्हटले की, ‘दशकांपासून हे मांजर थायलंडमध्ये नामशेष झाल्याचे मानले जात होते.

परंतु, सातत्यपूर्ण संरक्षण आणि वैज्ञानिक प्रयत्नांमुळे आज या वन्यजीवदिनी आपण त्याच्या पुनरागमनाचा उत्सव साजरा करू शकतो.’ हे आग्नेय आशियातील सर्वात लहान मांजर असून, त्याचे वजन अवघे 2 किलो (घरगुती मांजरापेक्षाही कमी) असते. यांच्या कपाळाचा भाग चपटा असतो, ज्यावरून त्यांना ‘फ्लॅट-हेडेड’ हे नाव पडले आहे. या मांजरांच्या पायांची बोटे पडदा असलेली असतात, ज्यामुळे त्यांना पाणथळ जागी चालणे आणि पाण्यात पोहत मासे पकडणे सोपे जाते. हे प्रामुख्याने मासे खाऊन जगतात. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाने 2014 मध्ये या प्रजातीला ‘धोक्यात’ असलेल्या श्रेणीत टाकले होते.

मानवी हस्तक्षेप, अतिमासेमारी आणि पाणथळ जमिनींचा नाश यामुळे या मांजरांची संख्या घटत चालली आहे. ‘पँथेरा’ने केलेल्या या आजवरच्या सर्वात मोठ्या सर्वेक्षणात केवळ मांजराचे दर्शनच झाले नाही, तर एका मादीसोबत तिचे पिल्लूही कॅमेर्‍यात कैद झाले आहे. याचा अर्थ दक्षिण थायलंडमध्ये या मांजरांची केवळ उपस्थितीच नाही, तर त्यांची पैदासदेखील होत आहे. ‘हा शोध केवळ थायलंडसाठीच नाही, तर संपूर्ण आग्नेय आशियातील वन्यजीव संवर्धनासाठी एक मोठा विजय आहे,’ असे थायलंडच्या राष्ट्रीय उद्यान विभागाचे महासंचालक अत्थापोल चारोएनचंसा यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT