Cavefish 
विश्वसंचार

Cavefish : अलाबामातील लष्करी तळाखाली आढळली ‘डेमन केव्हफिश’

स्ट्रेंजर थिंग्जच्या राक्षसावरून ठेवले नाव

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टनः अमेरिकेतील अलाबामा येथील एका प्रदूषित लष्करी तळाखालील गुंफामध्ये एका विचित्र माशाचा शोध लागला आहे. या माशाचे नाव ‘डेमन केव्हफिश’ असे ठेवण्यात आले असून, हा जगातील सर्वात दुर्मीळ माशांपैकी एक असू शकतो, असा दावा एका नवीन अभ्यासात करण्यात आला आहे.

शास्त्रज्ञांनी या फिकट रंगाच्या आणि डोळे नसलेल्या जीवाचे नाव ‘डेमोगॉर्गनइक्थिस आल्कानस’ (Demogorgonichthys arcanus) असे ठेवले आहे. नेटफ्लिक्सच्या प्रसिद्ध ‘स्ट्रेंजर थिंग्ज’ मालिकेतील भयानक ‘डेमोगॉर्गन’ या राक्षसावरून आणि ग्रीक पौराणिक कथांमधील पाताळातील राक्षसावरून हे नाव प्रेरित आहे. हा शोध शास्त्रज्ञांसाठी अत्यंत धक्कादायक ठरला आहे. कारण, हा मासा ज्या ‘बॉबकॅट केव्ह’ मध्ये आढळला, त्या गुहेचा गेल्या काही दशकांत सखोल अभ्यास झाला होता. ही भूगर्भातील प्रणाली ‘रेडस्टोन आर्सेनल’ या अमेरिकन लष्करी तळाचा भाग आहे, जो ऐतिहासिकदृष्ट्या रासायनिक शस्त्रांच्या निर्मितीचे केंद्र होता. बॉबकॅट केव्हमधील पाण्याच्या दर्जाची नियमित तपासणी केली जाते. कारण, तिथे दुर्मीळ ‘अल्बामा केव्ह श्रिमप’ (गुहेतील कोळंबी) चे जतन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ६ जुलै रोजी ‘सायंटिफिक रिपोर्टस्‌’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात संशोधकांनी या शोधाचे वर्णन ‘समोरच असूनही न दिसलेल्या शोधाचा उलगडा’ असे केले आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ अलाबामा (हंटस्‌विले) येथील केव्ह बायोलॉजी लॅबचे प्रमुख आणि या अभ्यासाचे मुख्य लेखक मॅथ्यू नीमिलर यांना २०२५ च्या सुरुवातीला बॉबकॅट केव्हच्या सर्वात मोठ्या ‘श्रिमप रूम’ नावाच्या भागात नियमित पाहणीदरम्यान हा मासा अचानक दिसला. ‘श्रिमप रूमच्या मागील बाजूस असलेल्या चिखलात माझा पाय घसरला आणि मी एका खोल डबक्यात पडलो,’ असे नीमिलर यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले, ‘मी खाली पडत असताना एका खडकाच्या कपारीखाली असलेला एक केव्हफिश आणि क्रेफिश घाबरून बाहेर आले.’ गढूळ पाण्यामुळे दृश्यमानता कमी होण्यापूर्वी नीमिलर यांनी पाण्याखालील कॅमेऱ्याने पटकन त्या प्राण्यांचे फोटो काढले. काही दिवसांनंतर जेव्हा त्यांनी फोटो तपासले, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की हा केव्हफिश त्या गुहेत आधीपासून आढळणाऱ्या ‘सदर्न केव्हफिश’ (Typhlichthys subterraneus) पेक्षा पूर्णपणे वेगळा दिसत होता. ‘या नवीन केव्हफिशच्या डोक्यामागे एक स्पष्ट उंचवटा (कुबड) होता, त्याचे तोंड लांब आणि सपाट होते आणि त्याच्या पर रचनांमध्ये फरक होता,’ नीमिलर यांनी सांगितले. ‘काही दिवसांनंतर आम्ही पुन्हा तिथे गेलो. त्या दुसऱ्या फेरीत आम्हाला स्पष्ट झाले की, तिथे आढळणाऱ्या एकूण केव्हफिशपैकी तब्बल निम्मे मासे हे याच नवीन प्रजातीचे होते.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT