झुरिच : आकाशातून उल्कापिंड पडणे ही फारशी मोठी बाब असत नाही. अनेकदा आकाशात छोटे-मोठे विस्फोट होत राहतात आणि या विस्फोटातून छोटे छोटे तुकडे पृथ्वीवर पडत राहतात. त्यांनाच उल्कापिंड असे संबोधले जाते. काहीवेळा हे उल्कापिंड इतक्या दुरून येतात की, त्यांना यासाठी किती वेळ लागला असेल, याचेही मोजमाप करता येत नाही; पण स्वित्झर्लंडमधील एका कंपनीने चक्क या उल्कापिंडांचा वापर करत अतिशय दुर्मीळ घड्याळ तयार केले असून या घड्याळाची किंमत देखील अगदी अव्वाच्या सव्वा आहे!
गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार, लेस एटेलियर्स लुईस मोईनेट या स्वित्झर्लंडच्या कंपनीने हे घड्याळ तयार केले आहे. ही कंपनी अगदी ठेवणीतील घड्याळे तयार करण्यासाठी खास ओळखली जाते. आता या कंपनीने जे अनोखे घड्याळ तयार केले, त्याची जगभरात चर्चा रंगणे साहजिक आहे. कारण, या नव्या घड्याळात एक-दोन नव्हे तर उल्कापिंडाचे 12 तुकडे वापरले गेले आहेत. याचमुळे हे अनोखे घड्याळ गिनीज बुकमध्ये समाविष्ट केले गेले आहे.
स्विसच्या कंपनीने या घड्याळाला कॉस्मोपोलीस असे ठेवले गेले आहे. उल्कापिंडाचे जे तुकडे या घड्याळात लावले गेले, ते प्रामुख्याने चंद्र, मंगळ ग्रह, उल्कापात आणि लघुग्रहावरून आलेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे घड्याळ तयार करताना अतिशय काळजी घेण्यात आली. 18 कॅरेट रोज गोल्ड केसच्या माध्यमातून निवडले गेले आणि त्याचा व्यास 40 मिलिमीटर इतका ठेवण्यात आला. त्यानंतर सावधानतेने उल्कापिंडांचे तुकडे योग्य आकारात कापून त्यांना घड्याळात सेट केले गेले. डॅनियल हासने तयार केलेल्या या घड्याळाची किंमत थोडीथोडकी नव्हे तर चक्क 2 कोटी रुपयांहून अधिक आहे.