Medical Breakthrough Treatment |दिवसातून १२ वेळा थांबायचे ‘तिचे’ हृदय नाविन्यपूर्ण प्रभावी वैद्यकीय उपचाराने रुग्णांना दिले जीवदान 
विश्वसंचार

Medical Breakthrough Treatment |दिवसातून १२ वेळा थांबायचे ‘तिचे’ हृदय नाविन्यपूर्ण प्रभावी वैद्यकीय उपचाराने रुग्णांना दिले जीवदान

पुढारी वृत्तसेवा

लंडन : जेवताना किंवा घास गिळताना माणसाचे हृदय अचानक थांबणे आणि तो बेशुद्ध पडणे, अशी कल्पना तरी आपण करू शकतो का? पण सारा हॉल नावाच्या एका महिलेसाठी प्रत्येक वेळचे जेवण हे अशाच जीवघेण्या संकटासारखे होते. सारा एका अत्यंत दुर्मीळ आजाराने ग्रस्त होती, ज्याचे नाव आहे ‘कार्डिओईनहिबिटरी सिंकोप.’ मात्र, एका नव्या आणि प्रायोगिक वैद्यकीय उपचाराने तिच्यासह अनेक रुग्णांचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले आहे.

‘कार्डिओईनहिबिटरी सिंकोप’ या आजारात शरीराच्या अनैच्छिक क्रिया घडत असताना, मज्जासंस्थेकडून हृदयाला चुकीचे आणि अतिसक्रिय संदेश पाठवले जातात. सारा हॉलच्या बाबतीत, जेव्हा ती अन्‍न गिळायची, तेव्हा तिच्या मज्जासंस्थेच्या चुकीच्या संकेतांमुळे तिचे हृदय काही क्षणांसाठी धडधडणे थांबवायचे. असे तिच्यासोबत दिवसातून तब्बल १२ वेळा व्हायचे, ज्यामुळे ती वारंवार बेशुद्ध पडायची. कोणत्याही सामान्य उपचाराने तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. ‘ब्रिटिश कार्डिओव्हस्कुलर सोसायटी’च्या वार्षिक परिषदेत सादर करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, वैज्ञानिकांनी या आजाराने ग्रस्त असलेल्या २५ रुग्णांवर एक प्रायोगिक उपचार पद्धती वापरली.

या उपचारांनंतर सर्व रुग्णांच्या प्रकृतीत कमालीची आणि नाट्यमय सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. हे प्राथमिक निष्कर्ष असले आणि त्याचे अजून पुनरावलोकन (Peer-review) झाले नसले, तरी या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी ही खूप मोठी आशादायक बातमी आहे. आपली स्वायत्त मज्जासंस्था शरीराच्या रोजच्या अनैच्छिक क्रिया, जसे की, जेवणे किंवा झोपणे, नियंत्रित करण्यासाठी विद्युत संकेतांचा वापर करते. यामध्ये शरीराची ‘फाईट-ऑर-फ्लाईट’ (संकटाचा सामना करणे किंवा पळून जाणे) आणि ‘रेस्ट-एंड-डायजेस्ट’ (आराम करणे आणि अन्‍न पचवणे) ही यंत्रणा समाविष्ट असते. ‘रेस्ट-एंड-डायजेस्ट’ यंत्रणेचे बहुतांश संकेत हे ‘वॅगस नर्व्ह’द्वारे पाठवले जातात. ही नस मेंदूच्या भागातून सुरू होऊन छाती आणि पोटातून जाते. गळ्यातून अन्‍न खाली उतरणे किंवा पाय दुमडून बसणे यासारखे बदल जेव्हा शरीरात होतात, तेव्हा ही नस मेंदूला अपडेट करत असते.

त्यानुसार मेंदू पचनक्रिया, श्वासोच्‍छ्‌वास आणि हृदयाचे ठोके बदलतो. परंतु, या आजाराच्या रुग्णांमध्ये ही यंत्रणा बिघडते आणि हृदय थेट थांबण्याचे संकेत दिले जातात. शास्त्रज्ञांच्या मते, काही प्राण्यांमध्ये वॅगस नर्व्हची ही सक्रियता एका वेगळ्या प्रक्रियेसाठी कारणीभूत ठरते, ज्याला ‘हायबरनेशन’ (शीतसुप्ती) म्हणतात. अस्वलासारखे प्राणी जेव्हा हिवाळ्यात दीर्घ झोपेसाठी जातात, तेव्हा त्यांच्या वॅगस नर्व्हमधून तीव्र संकेत पाठवले जातात, ज्यामुळे त्यांच्या शरीराचा चयापचय दर अनेक आठवड्यांसाठी अत्यंत कमी होतो. मानवामधील या आजारातही काहीशी अशीच प्रक्रिया पाहायला मिळते. या नव्या उपचार पद्धतीमुळे आता ‘कार्डिओईनहिबिटरी सिंकोप’च्या रुग्णांना वेदनेतून आणि भीतीतून मुक्ती मिळण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT