बोस्टन : अमेरिकेच्या मॅसॅच्युसेटस् किनारपट्टीवर मासेमारी करत असताना एका मच्छीमार व्यक्तीला तपकिरी रंगाच्या सामान्य लॉबस्टरऐवजी एक अतिशय दुर्मीळ आणि अद्भुत ‘कॅलिको’ नक्षीचा मादी लॉबस्टर सापडला आहे. या लॉबस्टरचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा रंग! तो चमकदार केशरी असून त्यावर काळ्या रंगाच्या फवार्यांनी आणि पिवळ्या रंगाच्या छटांनी तयार झालेली सुंदर नक्षी आहे. स्थानिक तज्ज्ञांच्या मते, असा ‘कॅलिको’ नक्षीचा लॉबस्टर सापडण्याची शक्यता फक्त 3 कोटींमध्ये एक इतकी आहे!
या अद्भुत लॉबस्टरला तज्ज्ञांनी ‘जॅकी’ असे नाव दिले आहे. सामान्यतः अशी अद्वितीय नक्षी असलेल्या लॉबस्टर्सना मत्स्यालये किंवा आलिशान रेस्टॉरंटस्कडून मोठी मागणी असते. मात्र, सुदैवाने ‘जॅकी’ला नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटीच्या मरीन सायन्स सेंटरला दान करण्यात आले आहे. सेंटरमधील विज्ञान शिक्षणतज्ज्ञ सिएरा मुनोज यांच्या म्हणण्यानुसार, सामान्य लॉबस्टर्सचा रंग लालसर, तपकिरी किंवा हिरवा असतो.
‘जॅकी’चे हे तेजस्वी रंग ‘अॅस्टॅक्सॅन्थिन’ नावाच्या रासायनिक संयुगांच्या आणि इतर रंगद्रव्यांच्या अनोख्या मिश्रणामुळे आले आहेत. यामुळे तिच्या कवचावर अत्यंत दुर्मीळ, ठिपकेदार किंवा ‘फ्रेकल्ड’ नक्षी तयार झाली आहे. माईक टफ्स या अनुभवी मच्छीमाराला बोस्टनच्या उत्तरेकडील ग्लॉसेस्टरजवळ मासेमारी करताना ‘जॅकी’ सापडली. तिच्या टोकाच्या सांध्यांवर ‘क्रस्टासायनिन’ नावाच्या प्रथिन्यांमुळे निळ्या रंगाची हलकीशी छटा देखील आहे.
तज्ज्ञांच्या मते, लॉबस्टरचा हा असामान्य रंग निसर्गात त्याला सहज ओळखता येतो, ज्यामुळे ती इतर प्राण्यांसाठी शिकार बनू शकते आणि कदाचित हेच त्यांच्या दुर्मीळतेचे एक कारण असू शकते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ‘जॅकी’ या केंद्रात नुकत्याच दाखल झालेल्या दुसर्या एका लॉबस्टरपेक्षाही जास्त दुर्मीळ आहे. या केंद्रात काही दिवसांपूर्वीच ‘नेपच्यून’ नावाचा ‘20 लाखांतून एक’ असलेला निळ्या रंगाचा लॉबस्टर देखील दान करण्यात आला आहे. नेपच्यूनला जनुकीय बदलामुळे निळा रंग मिळाला आहे. सध्या ‘जॅकी’ आणि ‘नेपच्यून’ या दोघांनाही त्यांच्या विशिष्ट स्वभावामुळे वेगवेगळ्या टँक्समध्ये ठेवण्यात आले आहे.