इराकमध्ये सापडला देवतांनी वेढलेल्या असिरियन राजाचा दुर्मीळ शिलालेख Pudhari File Photo
विश्वसंचार

इराकमध्ये सापडला देवतांनी वेढलेल्या असिरियन राजाचा दुर्मीळ शिलालेख

ही मूळ भव्य शिला इ.स.पू. 7 व्या शतकात तयार करण्यात आली होती

पुढारी वृत्तसेवा

बर्लिन : इराकमधील निनेवे ( Nineveh) या प्राचीन शहरात उत्खनन करणार्‍या पुरातत्त्वज्ञांनी एक अत्यंत दुर्मीळ आणि महत्त्वपूर्ण शिलालेख शोधून काढला आहे. या शिल्पावर असिरियन साम्राज्याच्या शेवटच्या सम्राटाची, त्याच्या आजूबाजूला असिरियन देवतांसह, नक्षी कोरलेली आहे. ही मूळ भव्य शिला इ.स.पू. 7 व्या शतकात तयार करण्यात आली होती; पण काही शतकांनंतर ती अचानक फोडून गुप्तपणे गाडून ठेवण्यात आली.

जर्मनीच्या हायडेलबर्ग विद्यापीठाचे पुरातत्त्व प्राध्यापक एरोन श्मिट ( Aaron Schmitt) यांच्या नेतृत्वाखालील टीमने निनेवेतील राजा अशुरबानिपाल (Ashurbanipal) याच्या राजवाड्याच्या सिंहासन कक्षाच्या खाली उत्खनन करताना ही शिला शोधली. हे शिल्प अनेक तुकड्यांमध्ये भंगलेले होते; पण त्यामधील द़ृश्य अत्यंत प्रभावी आहे. मध्यभागी आहे राजा अशुरबानिपाल, असिरियन साम्राज्याचा शेवटचा राजा (राज्यकाल: इ.स.पू. 669-631). त्याच्या दोन्ही बाजूंना आहेत दोन प्रमुख देवता : अशूर आणि ईश्तार. त्यांच्या मागे आहेत एक मत्स्य-देवता (fish deity) आणि एक वृश्चिक मानव (scorpion man). शिल्पाचे आकारमानही लक्षणीय आहे : सुमारे 18 ु 10 फूट (5.5 x 3 मीटर) आणि वजन 13.2 टन (12 मेट्रिक टन). हे शिल्प कदाचित जिप्सम खडकातून बनवले असावे, असे श्मिट यांचे म्हणणे आहे.

ही शिला हेलनिस्टिक कालखंडात (इ.स.पू. 2 रे ते 3 रे शतक) एका खड्ड्यात पुरण्यात आली होती, असे शास्त्रज्ञांचे अनुमान आहे; पण हे का झाले याबाबत अजूनही अंधार आहे. ‘आमच्याकडे कोणतीही ठोस माहिती नाही की हे शिल्प का गाडण्यात आले. हे खरोखरच रहस्यमय आहे.’ या शिल्पामध्ये प्रमुख देवतांची प्रतिमा असणेही आश्चर्यकारक बाब आहे. कारण, आजवर आढळलेल्या इतर असिरियन राजवाड्यांच्या शिल्पांमध्ये मूळ देवतांचे चित्रण दिसून आलेले नाही. याबाबत अधिक उत्खनन आणि विश्लेषणाचे कार्य सुरू आहे. संशोधक हे शिल्प त्याच्या मूळ स्थानावर परत बसवण्याची आणि जनतेसाठी खुले करण्याची योजना आखत आहेत. प्रा. श्मिट आशावादी आहेत की, पुढील उत्खननांमुळे हेलनिस्टिक काळातील निनेवे व तिथल्या लोकांचे द़ृष्टीकोन अधिक स्पष्टपणे समजून येतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT