old egg fossil discovery | 25 कोटी वर्षांपूर्वीच्या विचित्र अंड्याचा शोध 
विश्वसंचार

old egg fossil discovery | 25 कोटी वर्षांपूर्वीच्या विचित्र अंड्याचा शोध

पुढारी वृत्तसेवा

जोहान्सबर्ग : सस्तन प्राण्यांच्या उत्क्रांतीबाबत शास्त्रज्ञांनी एका मोठ्या रहस्याचा उलगडा केला आहे. डायनासोरच्या अस्तित्वापूर्वीच्या काळातील, म्हणजेच 25 कोटी वर्षांपूर्वीचे एक अश्मीभूत अंडे संशोधकांना सापडले आहे. या अंड्यामध्ये ‘लिस्टरोसॉरस’ या शाकाहारी प्राण्याचा भ्रूण वेटोळे घालून बसलेल्या स्थितीत आढळला असून, हे सस्तन प्राण्यांच्या पूर्वजांचे सापडलेले पहिले अंडे आहे. यामुळे सस्तन प्राण्यांचे पूर्वज अंडी घालत होते, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.

हे संशोधन पॅलेओन्टोलॉजिस्टना (जीवाश्मशास्त्रज्ञ) हे समजून घेण्यास मदत करेल की, हे प्राणी 25 कोटी 20 लाख वर्षांपूर्वीच्या ‘पर्मियन-ट्रायसिक’ विलोपनाच्या काळात कसे टिकून राहिले. या कालखंडाला ‘ग्रेट डायिंग’ असेही म्हटले जाते. कारण, त्यावेळी भीषण उष्णता, दुष्काळ, ज्वालामुखीचा उद्रेक आणि महासागरातील आम्लीकरणामुळे पृथ्वीवरील 90 टक्के प्रजाती नष्ट झाल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेतील विटवॉटरसँड विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक आणि पॅलेओन्टोलॉजिस्ट ज्युलियन बेनोईट यांनी सांगितले की, ‘अत्यंत कठीण वातावरणात तग धरून राहण्यासाठी पुनरुत्पादनाची रणनीती कशी महत्त्वाची ठरते, हे यावरून स्पष्ट होते. मोठी, बलकयुक्त अंडी आणि लवकर स्वावलंबी होणारी पिल्ले यामुळे ‘लिस्टरोसॉरस’सारखे प्राणी त्या काळातील अनिश्चित परिस्थितीत टिकून राहू शकले.’

हे अश्मीभूत अंडे 2008 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील झारीप जिल्हा परिसरात उत्खननादरम्यान सापडले होते. यात जवळजवळ पूर्ण विकसित झालेला भू्रण आहे. हा प्राणी ‘लिस्टरोसॉरस’ असून, तो सस्तन प्राण्यांचा सुरुवातीचा पूर्वज मानल्या जाणार्‍या ‘थेरॅप्सिडस्’ या गटातील आहे. हे प्राणी दिसायला डुकरासारखे होते. त्यांना केसांशिवाय त्वचा, कासवासारखी चोच आणि खाली झुकलेले दोन सुळे होते. शास्त्रज्ञांना या सस्तन पूर्वजाबद्दल अनेक वर्षांपासून माहिती होती. परंतु, हे प्राणी अंडी घालत की थेट पिलांना जन्म देत, यावर आतापर्यंत केवळ चर्चा सुरू होती. या नव्या शोधामुळे उत्क्रांतीच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दुवा स्पष्ट झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT