Rare Ancient Medallion | जेरुसलेममध्ये सापडले 1,300 वर्षे जुने दुर्मीळ पदक File Photo
विश्वसंचार

Rare Ancient Medallion | जेरुसलेममध्ये सापडले 1,300 वर्षे जुने दुर्मीळ पदक

पुढारी वृत्तसेवा

जेरुसलेम : पुरातत्त्व शास्त्रज्ञांना जेरुसलेममध्ये 1,300 वर्षांपूर्वीचे एक दुर्मीळ शिसे धातूचे पदक सापडले आहे. या पदकाच्या दोन्ही बाजूंना सात शाखा असलेल्या ‘मेनोराह’चे चित्र कोरलेले आहे. ‘मेनोराह’ हे दुसर्‍या ज्यू मंदिरातील एक पवित्र दीपस्तंभ मानले जाते.

संशोधकांच्या मते, हे पदक सहाव्या शतकाच्या शेवटी किंवा सातव्या शतकाच्या सुरुवातीस एखाद्या ज्यू व्यक्तीने गळ्यात घातले असावे. हा तो काळ होता जेव्हा जेरुसलेमवर ख्रिश्चन बायझंटाईन साम्राज्याची सत्ता होती. हे शहर सन 614 मध्ये ससानियन पर्शियन आणि नंतर 638 मध्ये इस्लामिक आक्रमकांच्या ताब्यात जाण्यापूर्वीच्या काही दशकांतील हे अवशेष आहेत. इस्रायल अँटिक्विटीज अ‍ॅथॉरिटीने दिलेल्या माहितीनुसार, जेरुसलेममधील ‘सिटी ऑफ डेव्हिड’ या पुरातत्त्व स्थळावर हे पदक सापडले.

एका प्राचीन वास्तूमध्ये खोदकाम करत असताना, अयायू बेलेटे या कर्मचार्‍याला दगडांच्या ढिगार्‍यात एक राखाडी रंगाची वस्तू दिसली. ती उचलून साफ केल्यावर त्यावर ‘मेनोराह’चे चिन्ह असल्याचे स्पष्ट झाले. हा शोध पुरातत्त्व शास्त्रज्ञांसाठी मोठा धक्का मानला जात आहे, कारण त्या काळात ज्यूंना जेरुसलेम शहरात प्रवेश करण्यास बंदी होती. इसवी सन 132 ते 136 दरम्यान रोमन साम्राज्याविरुद्ध ज्यूंनी केलेले ‘बार कोखबा’ बंड अयशस्वी ठरले होते.

त्यानंतर रोमन सम्राट हॅड्रियनने जेरुसलेमचे नाव बदलून ‘एलिया कॅपिटोलिना’ केले होते आणि जुडा प्रांताचे नाव बदलून ‘सीरिया-पॅलेस्टिना’ केले होते. हे नाव इस्रायलींच्या प्राचीन शत्रूंच्या (फिलिस्टाईन्स) नावावरून ठेवण्यात आले होते. ज्यूंच्या प्रवेशावर कडक निर्बंध असतानाही त्या काळात शहरात हे पदक सापडल्याने, तिथल्या तत्कालीन जनजीवनाबद्दल संशोधनात नवी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT