Ancient Radio Signal | पृथ्वी, सूर्य नव्हते तेव्‍हाचा रेडिओ सिग्नल पृथ्वीवर पोहोचला 
विश्वसंचार

Ancient Radio Signal | पृथ्वी, सूर्य नव्हते तेव्‍हाचा रेडिओ सिग्नल पृथ्वीवर पोहोचला

१० अब्ज वर्षांपूर्वी झाली होती निर्मिती : त्‍यावेळी विश्‍वाचे वय होते ३ अब्‍ज वर्षे

पुढारी वृत्तसेवा

सिडनी : पृथ्वीपासून अब्जावधी प्रकाशवर्षे दूर असलेल्या आकाशगंगेतील ऊर्जेचा एक रहस्यमय रेडिओ सिग्नल (संकेत) खगोलशास्त्रज्ञांनी शोधला आहे. या सिग्नलला पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी १० अब्ज वर्षांहून अधिक काळ लागला. आतापर्यंत नोंदवण्यात आलेल्या सर्वाधिक दूरच्या ‘फास्ट रेडिओ बर्स्ट’पैकी हा एक असून, विश्वाच्या सुमारे ८० टक्के इतिहासातून प्रवास करून तो पृथ्वीवर पोहोचल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. या शोधामुळे सुरुवातीच्या विश्वातील परिस्थिती आणि अदृश्य पदार्थांचा अभ्यास करण्यासाठी नवी संधी निर्माण झाली आहे. या संशोधनाचे निष्कर्ष ‘सायन्स’ या वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत. ‘एफआरबी २०२४०३०४बी’ असे या सिग्नलला नाव देण्यात आले आहे.

दक्षिण आफ्रिकेतील मीरकॅट रेडिओ दुर्बिणीच्या मदतीने हा सिग्नल टिपण्यात आला. त्यानंतर नासाच्या ‘जेम्स वेब’ अवकाश दुर्बिणीच्या साह्याने या सिग्नलचा उगम झालेल्या आकाशगंगेची ओळख पटवण्यात आली. हा सिग्नल यापूर्वीच्या सर्वाधिक दूरच्या नोंदीपेक्षा दुपटीहून अधिक अंतरावरून आल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे.

सूर्य आणि पृथ्वीच्या जन्मापूर्वीचा सिग्नल

सिडनी विद्यापीठातील संशोधक डॉ. थेमिया नानायक्कर यांच्या मते, हा रेडिओ सिग्नल निर्माण झाला, तेव्हा पृथ्वी आणि सूर्य यांचे अस्तित्वही नव्हते. त्या काळात विश्वाचे वय सुमारे तीन अब्ज वर्षे होते. आजच्या विश्वाच्या तुलनेत त्या वेळची परिस्थिती आणि आकाशगंगांची रचना वेगळी होती. ‘जेम्स वेब’ दुर्बिणीकडून मिळालेल्या माहितीवरून हा सिग्नल एका तरुण आणि आकाराने लहान आकाशगंगेतून आल्याचे दिसते. या आकाशगंगेत तारे अतिशय वेगाने तयार होत होते; मात्र जड मूलद्रव्यांचे प्रमाण तुलनेने कमी होते. त्यामुळे अशा परिस्थितीत एवढ्या तीव्र रेडिओ संकेतांची निर्मिती नेमकी कशी होते, हा प्रश्न संशोधकांसमोर आहे.

काही मिलिसेकंदांत प्रचंड ऊर्जा

‘फास्ट रेडिओ बर्स्ट’ (एफआरबी) म्हणजे अत्यंत कमी कालावधीसाठी निर्माण होणारे रेडिओ लहरींचे तीव्र उत्सर्जन. काही मिलिसेकंदांतच हे सिग्नल प्रचंड ऊर्जा उत्सर्जित करू शकतात. २००७ मध्ये अशा सिग्नल्‍सचा पहिला शोध लागल्यानंतर खगोलशास्त्रज्ञांना त्यांचे मूळ समजून घेण्याचे आव्हान आहे. या सिग्नल्‍सच्या उगमाबाबत अनेक शक्यता मांडण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘मॅग्नेटार’ या अत्यंत शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र असलेल्या न्यूट्रॉन ताऱ्यांमधून हे संकेत निर्माण होत असावेत. मात्र, नव्याने सापडलेल्या संकेताचा नेमका स्रोत अद्याप निश्चित झालेला नाही. २००७ पासून आतापर्यंत १० हजारांहून अधिक फास्ट रेडिओ बर्स्ट नोंदवण्यात आले आहेत. काही संकेत वारंवार दिसतात, काही ठरावीक काळानंतर थांबतात, तर काहींची केवळ एकदाच नोंद होते. नव्याने सापडलेला संकेत पुन्हा दिसणार का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अदृश्य पदार्थांचा शोध घेण्यास मदत

या शोधाचे महत्त्व केवळ दूरवरचा संकेत टिपण्यात नाही, तर त्याच्या मदतीने विश्वातील अदृश्य पदार्थांचा अंदाज घेता येण्यातही आहे. स्विनबर्न विद्यापीठातील खगोलभौतिकशास्त्रज्ञ प्रा. मॅथ्यू बेल्स यांच्या मते, अशा सिग्नल्‍सचा उपयोग विश्वातील पदार्थांचे प्रमाण समजून घेण्यासाठी करता येतो. भविष्यात आणखी दूरवरून येणारे रेडिओ संकेत शोधण्यात यश आल्यास, सुरुवातीच्या विश्वातील पदार्थांचे वितरण आणि आकाशगंगांच्या निर्मितीविषयी अधिक माहिती मिळू शकते. त्यामुळे विश्वाच्या उत्क्रांतीचा मागोवा घेण्यासाठी फास्ट रेडिओ बर्स्ट हे महत्त्वाचे साधन ठरण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT