लंडन : जर मानवी डोळे रेडिओ लहरी पाहू शकले, तर आपल्याला दिसणारे आकाश पूर्णपणे बदलून जाईल. या स्थितीमध्ये आपला सूर्य आकाशातून जवळजवळ नाहीसा होईल आणि चंद्र नेहमीच पौर्णिमेसारखा पूर्ण प्रकाशमान दिसेल, असा एक थक्क करणारा दावा प्रसिद्ध रेडिओ खगोलशास्त्रज्ञ एम्मा चॅपमन यांनी केला आहे. अवकाश संशोधन, खगोलशास्त्र आणि परग्रहावरील प्रगत जीवनाचा शोध घेण्यासाठी विश्वाचा 'रेडिओ दृष्टिकोन' किती महत्त्वाचा आहे, याचे विश्लेषण त्यांनी एका मुलाखतीत केले.
सामान्यतः आपण डोळ्यांनी जे आकाश पाहतो, ते दृश्य प्रकाशावर (व्हीजिबल लाईट) आधारित असते. परंतु, विश्वात अशा अनेक गोष्टी आहेत, त्या केवळ रेडिओ लहरींच्या माध्यमातूनच शोधल्या जाऊ शकतात. दक्षिण आफ्रिकेतील ‘एमईईआकेएटी’ या शक्तिशाली रेडिओ दुर्बिणीने आपल्या आकाशगंगेच्या केंद्राचे एक अद्भुत चित्र टिपले आहे. या चित्रावरून असे दिसून येते की, जर आपण रेडिओ प्रकाशात पाहू शकलो, तर आपले आकाश रात्रंदिवस चुंबकीय क्षेत्राच्या रेषा ताऱ्यांचे प्रचंड विलोभनीय विनाशी स्फोट (सुपर नोव्हा एक्सप्लोजन) आणि भारित वायूंनी (आयनाईज्ड गॅस) सतत चमकताना दिसेल.
एम्मा चॅपमन यांच्या मते, रेडिओ खगोलशास्त्रामुळे आपल्याला विश्वाच्या सुरुवातीच्या काळाचा, म्हणजेच पहिल्या ताऱ्यांच्या निर्मितीचा अभ्यास करता येतो. दृश्य प्रकाशाला अडवणारे वैश्विक धूलिकण रेडिओ लहरींना रोखू शकत नाहीत, ज्यामुळे आकाशगंगेच्या गर्भातील रहस्ये उलगडणे सोपे होते. थोडक्यात सांगायचे, तर हा दृष्टिकोन केवळ अवकाशाचे सौंदर्यच बदलत नाही, तर मानवजातीला ब्रह्मांड समजून घेण्याची एक नवी दृष्टी देतो. आपण विश्वाकडे ज्या प्रकारे पाहतो, त्यात रेडिओ खगोलशास्त्रामुळे एक क्रांतिकारी बदल घडून येत आहे.