विश्वसंचार

जगभरात लोकप्रिय होत आहे क्विनोआ

Arun Patil

नवी दिल्ली : सध्या लोकांच्या आहारात जुन्याच पण नव्याने माहिती होणार्‍या तसेच पौष्टिक पदार्थांचा समावेश होत आहे. मखाना असो किंवा ओट्स हे आता खेड्यापाड्यांतही अनेक घरांमध्ये दिसत आहेत. आता जगभर 'क्विनोआ'चाही वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. हे राजगिर्‍यासारखे दिसणारे एक पौष्टिक धान्य आहे. हे फार कमी लोकांना माहीत असेल की, 2013 हे वर्ष संयुक्त राष्ट्राच्या कृषी आणि अन्न संघटनेने 'आंतरराष्ट्रीय क्विनोआ वर्ष' म्हणून घोषित केले होते. याचा उद्देशच हा होता की, प्रत्येक व्यक्तीला या पिकाचे महत्त्व कळू शकेल. याला 'मदर ग्रेन' असेही म्हणतात. त्यामध्ये अंडी आणि गायीच्या दुधापेक्षा जास्त लोह असते.

पीक संशोधन नेटवर्कशी संबंधित शास्त्रज्ञांच्या मते, क्विनोआ हे एक वर्षाचे रब्बी पीक आहे आणि ते शरद ॠतुमध्ये घेतले जाते. त्याची बियाणे पांढरी, गुलाबी आणि हलक्या तपकिरी रंगाची असतात. राजगिराप्रमाणेच क्विनोआला धान्याच्या श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, आपल्या देशातही प्राचीन काळापासून याचा वापर अन्नधान्य आणि हिरव्या पालेभाज्या म्हणून केला जात आहे. कृषी शास्त्रज्ञांच्या मते, क्विनोआ खाल्ल्याने नागरिकाला निरोगी आयुष्य मिळते. त्यामुळेच ते एक पवित्र धान्य मानले गेले. अन्न आणि पोषण सुरक्षा लक्षात घेऊन प्राचीन पिकांकडे जागतिक स्तरावर पर्यायी अन्न पिके म्हणून पाहिले जात आहे.

क्विनोआ कमी पाणी, हलक्या प्रतीच्या जमिनीत आणि प्रतिकूल परिस्थितीतही चांगले उत्पादन देते. यामुळे अन्न आणि पौष्टिक गरजा पूर्ण करते. हे पीक लहान आणि अल्पभूधारक शेतकर्‍यांसाठी वरदान ठरू शकते. अन्न आणि कृषी संघटनेच्या मते, जगातील क्विनोआचे क्षेत्र हे 1,72,239 हेक्टर होते, उत्पादन 97,410 टन होते. जे 2015 मध्ये 1,97,637 हेक्टरपर्यंत वाढले, तर उत्पादन 1,93,822 टनांवर गेले. क्विनोआ इतर धान्यांपेक्षा अधिक पौष्टिक आहे. संपूर्ण प्रथिने समृद्ध असल्याने, त्याला भविष्यातील सुपर ग्रेन म्हटले जात आहे. लागवडीला विशेष हवामानाची गरज नसते. भारताचे हवामान त्याच्या लागवडीसाठी अनुकूल आहे. क्विनोआमधील प्रथिने तांदळाच्या दुप्पट, फायबर मक्यापेक्षा दुप्पट आणि फॅटस् गव्हाच्या तिप्पट आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT