Queen Termite | दर ३ सेकंदाला एका पिल्लाला जन्म देणारी अद्‌भुत माता; ५० वर्षे राहते प्रेग्नंट! 
विश्वसंचार

Queen Termite | दर ३ सेकंदाला एका पिल्लाला जन्म देणारी अद्‌भुत माता; ५० वर्षे राहते प्रेग्नंट!

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : निसर्गाने या पृथ्वीवर अनेक अद्‌भुत‌ आणि थक्क करणाऱ्या जीवांची निर्मिती केली आहे. सामान्यतः कीटकांचे आयुष्य काही आठवडे किंवा महिन्यांचे असते; परंतु वाळवीच्या साम्राज्यातील ‘राणी वाळवी’ निसर्गाचा एक असाच अद्‌भुत चमत्कार आहे. ही राणी वाळवी तिचे संपूर्ण आयुष्य फक्त अंडी घालण्यात घालवते आणि तिचे आयुष्य तब्बल २५ ते ५० वर्षांचे असू शकते.

दररोज घालते ३० हजार अंडी

तज्ज्ञांच्या मते, राणी वाळवी तिच्या २५ ते ५० वर्षांच्या आयुष्यात बहुतांश काळ गरोदर (प्रेग्नंट) राहते. ती दर ३ सेकंदाला एक अंडे देते, म्हणजेच एका दिवसात ती सुमारे ३०,००० अंडी घालते. ती आपल्या संपूर्ण आयुष्यात करोडो पिल्लांना जन्म देते. आफ्रिकन वाळवीच्या काही प्रजातींमधील राणी ५० वर्षे सातत्याने अंडी घालत राहते. सतत अंडी घालण्यामुळे राणी वाळवीचे पोट खूप लांब आणि फुगलेले असते. तिचे वजन इतके वाढते की तिला स्वतःहून साधे हलणे किंवा चालणेही अशक्य होते. अशा स्थितीत तिचे साम्राज्य सांभाळणारे ‘कामगार वाळवी’ तिची पूर्ण काळजी घेतात. ते तिला अन्न भरवतात, तिची स्वच्छता करतात आणि तिने दिलेली अंडी सुरक्षित ठिकाणी घेऊन जातात.

छोट्या जागेपासून सुरू होणारे वाळवीचे साम्राज्य या राणीमुळेच लाखो-करोडोंच्या संख्येपर्यंत पोहोचते. वाळवीच्या कॉलनीमध्ये प्रत्येकाचे काम ठरलेले असते. राणी फक्त अंडी घालते, राजा तिच्या सोबत राहतो, कामगार वाळवी अन्न आणि बांधकामाची जबाबदारी सांभाळतात, तर सैनिक वाळवी कॉलनीचे रक्षण करतात. जगभरात वाळवीला लाकूड खाऊन नुकसान करणारा जीव मानले जात असले, तरी जीवशास्त्राच्या दृष्टीने राणी वाळवी ही जगातील सर्वात आश्चर्यकारक माता ठरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT