Queen-Only Ant Species Japan | जपानमध्ये केवळ राणी मुंग्याच असलेली अनोखी मुंगी प्रजाती 
विश्वसंचार

Queen-Only Ant Species Japan | जपानमध्ये केवळ राणी मुंग्याच असलेली अनोखी मुंगी प्रजाती

नर आणि कामगार मुंग्यांचा संपूर्ण अभाव

पुढारी वृत्तसेवा

टोकियो : मुंग्यांच्या वसाहतीमध्ये सहसा एक राणी, अंडी न घालणार्‍या हजारो कामगार मुंग्या आणि काही नर मुंग्या असतात, असे आपल्याला माहीत आहे. मात्र, जपानमध्ये संशोधकांना मुंग्यांची एक अत्यंत दुर्मीळ प्रजाती आढळली आहे, जी या निसर्गनियमाला पूर्णपणे छेद देते. ‘टेम्नोथोरॅक्स किनोमुराई’ (Temnothorax kinomurai) नावाच्या या प्रजातीत फक्त राणी मुंग्याच असतात; यात नर किंवा कामगार मुंग्यांचा पूर्णपणे अभाव आहे.

‘करंट बायोलॉजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका नवीन अभ्यासात या विलक्षण प्रजातीचा उलगडा करण्यात आला असून, गेल्या 40 वर्षांपासून शास्त्रज्ञांना असलेला संशय आता पुराव्यासह सिद्ध झाला आहे. ही प्रजाती स्वतःची वसाहत स्वतः तयार करत नाही, तर ती एका ‘परजीवी’ (Parasitic) प्रमाणे वागते. संशोधनात असे समोर आले आहे की, या मुंग्या त्यांच्या जवळच्या नातेवाईक असलेल्या ‘टेम्नोथोरॅक्स माकोरा’ या प्रजातीच्या वसाहतीत घुसखोरी करतात. तिथे गेल्यावर त्या यजमान वसाहतीतील कामगार मुंग्यांना फूस लावून त्यांच्या स्वतःच्याच राणी आईची हत्या करायला लावतात. निसर्गात कामगार मुंग्यांनी स्वतःच्या राणीला मारणे ही अत्यंत दुर्मीळ घटना आहे. कारण, राणीशिवाय वसाहत जगू शकत नाही. राणीची हत्या केल्यानंतर, ‘टी. किनोमुराई’ राणी त्या वसाहतीचा ताबा घेते.

संशोधकांनी प्रयोगशाळेत सहा वसाहतींचा अभ्यास केला असता त्यांना धक्कादायक बाबी आढळल्या : 1. अंडी घालण्याची पद्धत : या राणी मुंग्या नराशी संबंध न येता (असंबंधित प्रजोत्पादन) अंडी घालतात. याला विज्ञानात ‘पार्थेनोजेनेसिस’ (Parthenogenesis) म्हणतात. 2. हुबेहूब नक्कल : या अंड्यातून जन्मणार्‍या सर्व मुंग्या या राणीच्या ‘क्लोन’ (Clones) असतात. सूक्ष्मदर्शकाखाली तपासणी केल्यावर असे आढळले की, या मुंग्यांच्या शरीरातील मिलनासाठी लागणारे अवयव कधीच वापरले गेले नव्हते.

3. फसवणूक : या नवीन जन्मलेल्या ‘राणी’ पिलांचा सांभाळ करण्यासाठी त्या यजमान वसाहतीतील वाचलेल्या कामगार मुंग्यांना भाग पाडतात. अभ्यासात शास्त्रज्ञांनी लिहिले आहे की, ‘कामगार मुंग्या नसलेले परजीवी जीवन आणि नराशिवाय प्रजोत्पादन करण्याची क्षमता, असा दुर्मीळ संगम या प्रजातीत आढळतो.’ निसर्गात नेमक्या कोणत्या परिस्थितीमुळे या मुंग्यांनी नर आणि कामगार मुंग्यांची गरजच संपवून टाकली, याचा शोध आता संशोधक घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT