Future of medical technology | प्रयोगशाळेतून थेट रुग्णालयापर्यंत! क्वांटम विज्ञान ठरणार वैद्यकीय क्षेत्रातील पुढची मोठी क्रांती 
विश्वसंचार

Quantum science | प्रयोगशाळेतून थेट रुग्णालयापर्यंत! क्वांटम विज्ञान ठरणार वैद्यकीय क्षेत्रातील पुढची मोठी क्रांती

पुढारी वृत्तसेवा

शिकागो : ज्याप्रमाणे एमआरआय मशिनने वैद्यकीय निदानात क्रांती घडवून आणली, त्याचप्रमाणे आता क्वांटम तंत्रज्ञान कर्करोगापासून ते हृदयाच्या आजारांपर्यंतच्या उपचारात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी सज्ज झाले आहे. शिकागो विद्यापीठातील नवनिर्मित बर्ग्रेन सेंटर फॉर क्वांटम बायोलॉजी अँड मेडिसिन या दिशेने वेगाने पाऊल उचलत आहे. प्राध्यापक ग्रेग एंजेल आणि ज्युलियन सॉल्वे या केंद्राचे नेतृत्व करत असून, क्वांटम साधनांचा वापर क्लिनिकमध्ये करून रुग्णांची सेवा अधिक अचूक कशी करता येईल, यावर ते काम करत आहेत.

क्वांटम मेडिसिन म्हणजे नक्की काय?

क्वांटम विज्ञान हे अतिसूक्ष्म कणांच्या (स्मॉलेस्ट पार्टिकल्स) वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. वैद्यकीय भाषेत सांगायचे तर यामध्ये पेशींच्या आत बसू शकणारे छोटे, अतिसूक्ष्म सेन्सर्स तयार केले जात आहेत, जे पेशींमधील हालचाली आणि बदलांचे अचूक टिपण करतील. त्यानंतर अचूक निदान केले जाईल. जसा एमआरआय शरीरातील पाण्याचे अणू स्कॅन करून ट्यूमर शोधतो, तसेच क्वांटम टूल्स पेशी एकमेकांशी कसा संवाद साधतात आणि आजार नेमका कुठे सुरू होतो, हे शोधण्यास मदत करतील.

द्विभाषिक शास्त्रज्ञांची नवी पिढी

या केंद्राचे एक मुख्य उद्दिष्ट म्हणजे असे डॉक्टर आणि शास्त्रज्ञ तयार करणे, ज्यांना वैद्यकीय समस्या आणि क्वांटम भौतिकशास्त्र या दोन्ही भाषा समजतील. या द्विभाषिक शास्त्रज्ञांमुळे प्रयोगशाळेतील शोध थेट रुग्णांच्या खाटांपर्यंत पोहोचणे सोपे होईल.

असे आहेत वैद्यकीय क्षेत्रातील संभाव्य फायदे

ऑक्सिजनची कमतरता ओळखणे : शरीरातील उतींना (ट्युश्यू) पुरेसा ऑक्सिजन मिळतोय की नाही, हे शोधणे कठीण असते. क्वांटम सेन्सर्सद्वारे हे सहज शक्य होईल, ज्यामुळे हृदयविकार आणि कर्करोगाच्या रुग्णांवर वेळेवर उपचार करता येतील.

नवीन औषधांचा शोध : क्वांटम कॉम्प्युटिंगच्या मदतीने नवीन रेणूंची गणना आणि औषधांची निर्मिती प्रयोगशाळेत अधिक वेगाने करता येईल.

शस्त्रक्रिया टाळता येणार : आजार अगदी सुरुवातीच्या टप्प्यात समजल्यामुळे अनेकदा वेदनादायक आणि खर्चिक शस्त्रक्रियांची गरज उरणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT