न्यूयॉर्क/बर्लिन : सुपरकंडक्टिंग क्वांटम कॉम्प्युटर प्रणालीमध्ये शास्त्रज्ञांनी ‘क्यूबिट फिडेलिटी’चा नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. क्वांटम कॉम्प्युटिंगच्या क्षेत्रातील हा एक मैलाचा दगड मानला जात असून, यामुळे जगातील सर्वात वेगवान सुपरकॉम्प्युटरपेक्षाही शक्तिशाली मशिन बनवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
‘नेचर कम्युनिकेशन्स’ या प्रसिद्ध शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, IBM, जर्मनीतील RWTH आखन युनिव्हर्सिटी आणि लॉस एंजेलिसमधील क्वांटम एलिमेंटस् या स्टार्टअपच्या संशोधकांनी हा शोध लावला आहे. क्वांटम कॉम्प्युटरमधील चुका सुधारणे आणि त्या रोखणे, हा या क्षेत्रातील सर्वात मोठा अडथळा होता, जो आता दूर करण्यात यश आले आहे. सुपरकंडक्टिंग क्वांटम कॉम्प्युटरमध्ये गणनेसाठी ‘क्वांटम बिटस्’ म्हणजेच क्यूबिटस् वापरले जातात. फिजिकल क्यूबिटस् : हे कॉम्प्युटरच्या हार्डवेअरमध्ये सुपरकंडक्टिंग धातूच्या जटिल सर्किटच्या स्वरूपात असतात.
जेव्हा हे तापमान उणे 273 अंश सेल्सिअसच्या जवळ नेले जाते, तेव्हा त्यातून ऊर्जा न गमावता माहिती प्रवाहित होते. लॉजिकल क्यूबिटस् : क्यूबिटस् अत्यंत नाजूक असतात; साध्या कंपनाने किंवा बाह्य आवाजाच्या व्यत्ययानेही त्यातील माहिती नष्ट होऊ शकते. ही नाजूकता भरून काढण्यासाठी अनेक ‘फिजिकल क्यूबिटस्’ एकत्र करून एक ‘लॉजिकल क्यूबिट’ तयार केला जातो. संशोधकांनी IBM च्या 127-क्यूबिट असलेल्या ‘कियिव’ आणि ‘मॅराकेश’ प्रोसेसरचा वापर केला. या संशोधनातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ‘लॉजिकल एरर’वर नियंत्रण मिळवणे.
जेव्हा एका लॉजिकल क्यूबिटमधील अनेक फिजिकल क्यूबिटस् एकाच वेळी बाह्य व्यत्ययामुळे निकामी होतात, तेव्हा सिस्टीमला चुकीचे सिग्नलच ‘योग्य’ वाटू लागतात. यामुळे संपूर्ण गणिती प्रक्रिया बिघडते. शास्त्रज्ञांनी असा गट तयार केला आहे जिथे फिजिकल क्यूबिटस् ‘पॅरिटी बिटस्’ म्हणून काम करतात, जे चुका शोधून त्या काढून टाकतात. या नवीन यशामुळे क्यूबिटस्ची विश्वासार्हता वाढली आहे. हे संशोधन भविष्यात अधिक अचूक आणि शक्तिशाली क्वांटम कॉम्प्युटर्स विकसित करण्यासाठी पाया ठरणार आहे.