ALEKO SYNTELIS
विश्वसंचार

quantum computer | सुपरकॉम्प्युटरलाही न जमणारी गणिते क्वांटम कॉम्प्युटरने सोडवली!

‘आईबीएम’च्या शास्त्रज्ञांचा मोठा दावा

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : आयबीएम आणि त्यांच्या भागीदार संस्थांमधील शास्त्रज्ञांनी एकाचवेळी तीन वेगवेगळ्या प्रयोगांद्वारे ‘क्वांटम ॲडव्हान्टेज’ सिद्ध केल्याचा दावा केला आहे. जगातील सर्वात वेगवान क्लासिकल सुपरकॉम्प्युटरलाही जे काम करणे अशक्य आहे, ते क्वांटम कॉम्प्युटिंगच्या क्षमतेने साध्य करून दाखवले आहे. क्वांटम कॉम्प्युटिंगच्या क्षेत्रातील हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

या प्रयोगांमुळे क्वांटम कॉम्प्युटर्स अत्यंत गुंतागुंतीची आणि उपयुक्त अशी संगणकीय कामे अवघ्या काही मिनिटांत पूर्ण करू शकतात, हे स्पष्ट झाले आहे. उदाहरणार्थ, रासायनिक प्रक्रियांची गुंतागुंतीची गणिते सोडवण्यासाठी सुपरकॉम्प्युटरला कित्येक वर्षांचा कालावधी लागू शकतो, तोच प्रोग्राम हे क्वांटम कॉम्प्युटर्स मिनिटांत पार पाडू शकतात. आयबीएमच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रयोग सिद्ध करतात की, क्वांटम कॉम्प्युटर्स कोणत्याही पारंपरिक किंवा क्लासिकल कॉम्प्युटिंग पद्धतीपेक्षा अधिक विश्वासार्ह, स्वस्त, वेगवान आणि अचूक उत्तरे देऊ शकतात.

एका पत्रकार परिषदेत आयबीएम, अल्गोरिमिक, क्यूएडएमए आणि युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोच्या प्रतिनिधींनी या तीन प्रयोगांची माहिती दिली. या सर्व प्रयोगांमध्ये आयबीएमच्या ‘क्वांटम हेरॉन आर ३’ या सुपरकंडक्टिंग क्वांटम कॉम्प्युटर सिस्टीमचा वापर करण्यात आला होता. यात त्रुटी कमी करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले. क्वांटम ॲडव्हान्टेज दाखवणे आणि त्याची पडताळणी करणे हा या संशोधनाचा मुख्य उद्देश होता.

‘क्यूएडएमए’च्या सहकार्याने झालेल्या पहिल्या अभ्यासात ‘फ्‍लोके ट्रान्सव्हर्स-फिल्ड आयझिंग मॉडेल’ या प्रणालीचा अभ्यास करण्यात आला. बाह्य ऊर्जेच्या स्पंदनांमुळे एखाद्या पदार्थाचे चुंबकीय गुणधर्म कसे बदलतात, याचा अभ्यास करण्यासाठी भौतिकशास्त्रज्ञ या मॉडेलचा वापर करतात. क्लासिकल कॉम्प्युटर्ससाठी हे गणित सोडवणे अत्यंत कठीण असते; कारण या मॉडेलचे गणितीय समीकरण जसे मोठे होते, तशी त्याची प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची आणि कठीण होत जाते. हे संशोधन ‘arXiv’ या प्रीप्रिंट सर्व्हरवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT