वॉशिंग्टन ः निसर्गाच्या नियमानुसार, जेव्हा एखादा परदेशी जीव एखाद्या नवीन भागात शिरकाव करतो आणि आपले पाय पसरतो, तेव्हा तो तिथल्या संपूर्ण इकोसिस्टीमसाठी कर्दनकाळ ठरतो. सध्या अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यात नेमकी हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. फ्लोरिडाचा प्रसिद्ध दलदलीचा प्रदेश असलेल्या ‘एव्हरग्लेडस्’ मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, ज्याने शास्त्रज्ञ आणि वन्यजीव प्रेमींची चिंता वाढवली आहे. एका व्यावसायिक सर्पमित्राला जंगलाच्या मध्यभागी बर्मीज अजगराची ( Burmese Pythons) दोन अशी घरटी सापडली आहेत, ज्यामध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल 120 अंडी लपवून ठेवली होती. जर ही अंडी फुटली असती, तर एकाच वेळी 120 नवीन धोकादायक शिकारी या जंगलात धुमाकूळ घालण्यासाठी तयार झाले असते.
हा भयानक शोध फ्लोरिडाच्या जंगलात सक्रिय असणारे प्रसिद्ध सर्पमित्र केविन पावलिडिस यांनी लावला आहे. केविन यांनी दलदलीच्या गवतामध्ये लपलेल्या या घरट्यांचा व्हिडीओ त्यांच्या ‘स्नेकाहोलिक’ या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पांढर्या रंगाची मोठी अंडी झुडपांच्या मागे लपलेली स्पष्ट दिसत आहेत. दोन वेगवेगळ्या घरट्यांमध्ये मिळून एकूण 120 अंडी सापडली आहेत. एकाच ठिकाणी एवढी अंडी मिळण्याचा अर्थ असा आहे की, तिथे अनेक मादी अजगर एकत्र येऊन पुनरुत्पादन करत आहेत.
हे बर्मीज अजगर फ्लोरिडाचे मूळ निवासी नाहीत, तर ते प्रामुख्याने आग्नेय आशियातील आहेत. संशोधकांच्या मते, अनेक वर्षांपूर्वी लोक हौस म्हणून यांना परदेशातून आणून पाळीव प्राणी म्हणून ठेवत असत. मात्र, जेव्हा हे साप खूप मोठे झाले किंवा पिंजर्यातून पळून गेले, तेव्हा लोकांनी त्यांना जंगलात सोडून दिले. फ्लोरिडामधील उष्ण आणि दमट हवामान या अजगरांना खूप मानवले. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जंगलात अजगराची शिकार करणारा दुसरा कोणताही मोठा प्राणी नसल्यामुळे त्यांची लोकसंख्या अत्यंत धोकादायक वेगाने वाढली.