व्हँकुव्हर आयलंड, कॅनडा : कॅन्सरसारख्या असाध्य आजाराच्या अंतिम टप्प्यावर असलेल्या रुग्णांसाठी सायलोसायबिन हे औषध एक आशेचा किरण ठरत आहे. एक वैद्यकीय अहवालानुसार, कॅनडातील एका 32 वर्षीय मातेच्या उदाहरणावरून या औषधाने मृत्यूशय्येवरील रुग्णांचे मानसिक आरोग्य कसे सुधारू शकते, हे स्पष्ट झाले आहे.
सायलोसायबिन हा सायकेडेलिक मशरूम (ज्याला मॅजिक मशरूम असेही म्हणतात) मध्ये आढळणारा एक मनोविकारजनक घटक आहे. हे मेंदूतील संवेदना आणि भावनांवर खोलवर परिणाम करते.
कॅनडाच्या व्हँकुव्हर आयलंडवर राहणार्या एका 32 वर्षीय मातेला चौथ्या स्टेजचा कॅन्सर (मेटास्टॅटिक कॅन्सर) होता, ती शारीरिक वेदना आणि मृत्यूच्या भीतीमुळे पूर्णपणे खचली होती. ती दिवसभर अंथरुणावर पडून रडत असे. मात्र, वैद्यकीय देखरेखीखाली तिला सायलोसायबिनचा डोस देण्यात आला, त्यानंतर तिच्यात कमालीचा बदल दिसून आला.
तिच्यातील मृत्यूची भीती कमी होऊन तिने आपल्या उरलेल्या आयुष्याचा स्वीकार केला आणि कुटुंबासोबत शांततेत वेळ घालवण्यास सुरुवात केली.
शास्त्रज्ञांच्या मते, सायलोसायबिन मेंदूच्या डिफॉल्ट मोड नेटवर्कमध्ये बदल घडवते. हे नेटवर्क आपल्या अहंकाराशी (सेल्फ इगो) जोडलेले असते. औषध घेतल्यावर हे नेटवर्क काही काळासाठी शांत होते, ज्यामुळे रुग्णाला स्वतःच्या अस्तित्वापेक्षाही मोठ्या जगाशी जोडल्यासारखे वाटते.
1. गेम चेंजर : पारंपरिक औषधे फक्त वेदना कमी करतात; पण सायलोसायबिन मानसिक शांतता (स्पिरिच्युअल पीस) देते.
2. मानसिक तणावातून मुक्ती : कॅन्सर रुग्णांमधील तीव्र नैराश्य आणि भीती घालवण्यासाठी हे औषध गेम चेंजर ठरू शकते.
3. नियंत्रित वापर : हे औषध कोणत्याही प्रकारे व्यसन म्हणून न घेता, केवळ डॉक्टरांच्या आणि थेरपिस्टच्या उपस्थितीत दिले जाते.
मृत्यू अटळ असला, तरी तो सन्मानाने आणि शांततेत स्वीकारण्यासाठी सायलोसायबिन ही एक नवीन वैद्यकीय क्रांती ठरू शकते. सध्या जगभरातील अनेक देश या औषधाला अंतिम रुग्ण सेवा (पॅलिएटिव्ह केअर) मध्ये समाविष्ट करण्याबाबत विचार करत आहेत.