न्यूयॉर्क : आजच्या डिजिटल युगात लोकांची विचारसरणी कशी बदलत आहे, याचे एक अजब उदाहरण अमेरिकेतून समोर आले आहे. एखाद्याच्या अंत्यविधीला भाडोत्री माणसे बोलावण्याच्या 'रेंट अ मॉर्नर' या जुन्या संकल्पनेला आता कॉर्पोरेट आणि रहस्यमयी स्वरूप मिळाले आहे. सोशल मीडियावरील दाव्यानुसार, अमेरिकेत काही एजन्सीज अंत्यसंस्कारासाठी 'प्रोफेशनल' महिलांना भाड्याने पाठवत आहेत, त्या तिथे येऊन रडण्याचे तब्बल ५०,००० रुपये (५०० डॉलर्स) घेतात.
व्हायरल पोस्टनुसार, अंत्यविधी सुरू असताना अचानक एक आलिशान कार दारात येऊन थांबते. त्यातून काळ्या कपड्यात आणि डोळ्यांवर गॉगल लावलेली एक अज्ञात महिला उतरते. ती कुटुंबापासून काही अंतरावर शांतपणे उभी राहते, डोळ्यांतून अश्रू गाळते आणि कोणाशीही न बोलता तिथून निघून जाते. तिचा मृत व्यक्तीशी किंवा कुटुंबाशी कोणताही संबंध नसतो. परंतु, तिच्या या रहस्यमयी एंट्रीमुळे अंत्यविधीला आलेले पाहुणे चक्रावून जातात. ‘ही महिला कोण? मृत व्यक्तीचे काही गुपित होते का?’ असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात निर्माण करणे हाच या सर्व्हिसचा मुख्य उद्देश आहे. अनेक लोकांना आपल्या मृत्यूनंतरही आपली चर्चा व्हावी आणि आपला अंत्यविधी लोकांनी आयुष्यभर लक्षात ठेवावा, असे वाटते. हाच धागा पकडून या कंपन्यांनी हा व्यवसाय सुरू केला आहे. या महिलांना आधीच मृत व्यक्तीबद्दल थोडी माहिती दिली जाते, जेणेकरून त्या आपली भूमिका चोख बजावू शकतील.