Gumma Salt | हिमाचलच्या प्रसिद्ध ‘गुम्मा मिठा’चे पुन्हा उत्पादन सुरू होणार 
विश्वसंचार

Gumma Salt | हिमाचलच्या प्रसिद्ध ‘गुम्मा मिठा’चे पुन्हा उत्पादन सुरू होणार

पुढारी वृत्तसेवा

मंडी (हिमाचल प्रदेश) : हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील द्रंग येथील प्रसिद्ध ‘गुम्मा मीठ’ सध्या प्रचंड चर्चेत आहे. हे मीठ प्रामुख्याने पारंपरिक सैंधव मीठ (रॉक सॉल्ट) म्हणून ओळखले जाते. उपवासाचे पदार्थ, रायते तसेच विविध व्यंजनांची चव वाढवण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. आता हे गुम्मा मीठ देशभरातील घराघरांत पोहोचण्यासाठी सज्ज झाले असून, गेल्या दीड वर्षापासून बंद असलेल्या खाणींमधून पुन्हा उत्खनन सुरू करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

‘हिंदुस्थान सॉल्टस लिमिटेेड’च्या नव्या खाणकाम आराखड्याला ‘भारतीय खाण ब्युरो’कडून (IBM) अधिकृत मंजुरी मिळाली आहे. सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच प्रत्यक्ष उत्पादन सुरू केले जाईल. दर्जा, तपासणी आणि आवश्यक अन्न सुरक्षा निकष पूर्ण केल्यानंतरच हे मीठ खाण्यायोग्य उत्पादन म्हणून बाजारात आणले जाईल. मंजूर आराखड्यानुसार, पुढील पाच वर्षांत सुमारे ७,७०० टन नैसर्गिक रॉक सॉल्ट उत्खनन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आरोग्य तज्ज्ञांनुसार, गुम्मा मिठामध्ये प्रामुख्याने सोडियम क्लोराईड असते. याशिवाय नैसर्गिक खडक मिठाच्या गुणधर्मांनुसार यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह आणि सल्फेट ही खनिजेही अल्प प्रमाणात आढळतात.

सोडियम क्लोराईड : शरीरातील द्रव्यांचे प्रमाण संतुलित ठेवण्यास आणि मज्जासंस्थेचे कार्य सुरळीत चालण्यास मदत करते. कॅल्शियम व मॅग्नेशियम : हाडे आणि स्नायूंच्या मजबुतीसाठी आवश्यक. पोटॅशियम : स्नायू आणि हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त. लोह : शरीरात हिमोग्लोबिनच्या निर्मितीस हातभार लावते. कोमट पाण्यात हे मीठ टाकून गुळण्या केल्यास घशातील खवखव दूर होण्यास मदत होते. याशिवाय गॅस, बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटीच्या तक्रारींवर हे मीठ गुणकारी मानले जाते. श्वसनविकार तसेच स्नायूंचा ताठरपणा कमी करण्यासाठीही याचा चांगला उपयोग होतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मीठ कोणतेही असो, साधे, काळे किंवा सैंधव त्याचे सेवन मर्यादित प्रमाणातच केले पाहिजे. ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’च्या (ICMR) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, निरोगी आरोग्यासाठी प्रौढ व्यक्तीने दिवसाला ५ ग्रॅमपेक्षा कमीच मिठाचे सेवन केले पाहिजे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT