अमेरिकन कंपनीचे ‘ब्ल्यू घोस्ट’ उतरले चंद्रावर Pudhari File Photo
विश्वसंचार

अमेरिकन कंपनीचे ‘ब्ल्यू घोस्ट’ उतरले चंद्रावर

चंद्राच्या ईशान्य भागात यशस्वीरीत्या उतरले

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : अमेरिकन स्पेस कंपनी ‘फायरफ्लाय एअरोस्पेस’ने चंद्रावर आपले अंतराळयान उतरवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. हे साध्य करणारे दुसरे खासगी मिशन ठरले आहे. ब्ल्यू घोस्ट मिशन 1 हे अंतरिक्ष यान 2 मार्च रोजी सकाळी 3:34 वाजता (अमेरिकन वेळेनुसार) चंद्राच्या ईशान्य भागात यशस्वीरीत्या उतरले. टेक्सासच्या ऑस्टिनमधील मिशन कंट्रोल रूममध्ये या घोषणेनंतर वैज्ञानिकांनी आनंदोत्सव साजरा केला.

फायरफ्लाय एअरोस्पेसचे हे मिशन नासाच्या कमर्शियल लूनर पेलोड सर्व्हिसेस उपक्रमाचा भाग आहे. या मोहिमेचा उद्देश चंद्रावर विज्ञान व तंत्रज्ञानाच्या चाचण्या घेणे तसेच भविष्यातील चांद्रयान मोहिमांची किंमत कमी करणे हा आहे. आर्टेमिस प्रकल्पाच्या माध्यमातून नासाने भविष्यात मानवाला पुन्हा चंद्रावर पाठवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ब्ल्यू घोस्ट लँडरचे प्रक्षेपण 15 जानेवारी 2025 रोजी स्पेसएक्स फाल्कन 9 रॉकेट वरून करण्यात आले होते. प्रवासादरम्यान या यानाने पृथ्वी व चंद्राच्या अविस्मरणीय द़ृश्यांचे फोटो टिपले. चंद्रावर उतरल्यावर, ब्ल्यू घोस्टने चंद्राच्या पृष्ठभागाची पहिली छायाचित्रे पृथ्वीला पाठवली. फायरफ्लाय एअरोस्पेसने सोशल मीडियावर सांगितले की, ‘ही छायाचित्रे आमच्या संघाच्या मेहनतीचे व समर्पणाचे प्रतीक आहेत. ब्ल्यू घोस्ट मोहिमेमध्ये असलेली साहसी महत्त्वाकांक्षा, अपराजित प्रेरणा आणि नवकल्पनांची भावना यातून स्पष्ट होते.’ या मोहिमेमुळे फायरफ्लाय एअरोस्पेस चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारी दुसरी खासगी कंपनी ठरली आहे. यापूर्वी, इंट्यूटिव मशिन्स या ह्यूस्टनस्थित कंपनीने ओडीसियस लँडर चंद्रावर उतरवला होता. यापूर्वी केवळ पाच देश - सोव्हिएत संघ, अमेरिका, चीन, भारत आणि जपान यांनीच चंद्रावर यशस्वी लँडिंग केले आहे.

महत्त्वपूर्ण अंतराळ निरीक्षणे शक्य

ब्ल्यू घोस्ट 14 मार्च रोजी चंद्रग्रहणाची उच्च प्रतीची छायाचित्रे टिपण्याची अपेक्षा आहे. यावेळी पृथ्वी, चंद्राच्या क्षितिजावरून सूर्याला झाकेल. 16 मार्च रोजी हे यान चंद्राच्या सूर्यास्ताचे निरीक्षण करणार आहे, जे सौर प्रभावामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर धूळ कशी उडते याचा अभ्यास करण्यास मदत करेल. ब्ल्यू घोस्ट मिशन अंतराळ संशोधनात एक नवा टप्पा असल्याचे मानले जात आहे, आणि भविष्यातील चांद्रयान मोहिमांसाठी महत्त्वपूर्ण ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT