Pregnancy Anemia | गरोदरपणातील ॲनिमियामुळे बाळाचा मेंदू होतो लहान 
विश्वसंचार

Pregnancy Anemia | गरोदरपणातील ॲनिमियामुळे बाळाचा मेंदू होतो लहान

पुढारी वृत्तसेवा

लंडन : गरोदरपणात महिलांना होणाऱ्या रक्ताल्पतेचा (ॲनिमिया) थेट आणि दीर्घकालीन परिणाम त्यांच्या बाळांच्या मेंदूच्या विकासावर होतो, असा महत्त्वपूर्ण निष्कर्ष एका आंतरराष्ट्रीय संशोधनातून समोर आला आहे. अशा मातांच्या बाळांचा मेंदू आकाराने लहान राहतो; विशेषतः हालचाली, शिकण्याची क्षमता आणि भावनांवर नियंत्रण ठेवणारे मेंदूचे भाग सर्वाधिक प्रभावित होतात.

'किंग्ज कॉलेज लंडन' आणि 'युनिव्हर्सिटी ऑफ केपटाऊन' यांच्या संयुक्त संशोधकांनी केपटाऊनमधील ३०० हून अधिक माता व त्यांच्या बालकांचा दोन वर्षांपर्यंत अभ्यास केला. संशोधनात आढळले की, सौम्य ॲनिमिया असलेल्या मातांच्या बाळांच्या मेंदूचा एकूण आकार निरोगी मातांच्या मुलांपेक्षा सरासरी ४ टक्क्यांनी कमी होता. विशेषतः 'प्युटामेन', 'कॉडेट न्यूक्लियस' आणि 'कॉर्पस कॅलोसम' या तीन मुख्य भागांवर हा परिणाम दिसून आला. पहिल्या दोन वर्षांत हा फरक अधिक वाढत गेला. वयाच्या १२ व्या महिन्यात कॉर्पस कॅलोसमचा आकार ४ टक्क्यांनी कमी होता, तर २४ व्या महिन्यापर्यंत ही तूट ६ टक्क्यांवर पोहोचली.

शालेय वयात बौद्धिक अडचणींचा धोका

प्रमुख संशोधक जेसिका रिंगशॉ यांच्या मते, हे फरक कालांतराने भरून निघत नाहीत. मुले सहा वर्षांची होऊन शाळेत जाऊ लागतात, तेव्हा या फरकांमुळे शिकण्यात, विचार प्रक्रियेत आणि भावनांच्या नियंत्रणात गंभीर अडचणी निर्माण होऊ शकतात.

तातडीच्या उपाययोजनांची गरज

जगातील एक तृतीयांशपेक्षा जास्त गरोदर महिलांना लोह कमतरतेमुळे ॲनिमियाचा सामना करावा लागतो; दक्षिण आशिया आणि आफ्रिकेत हे प्रमाण सर्वाधिक आहे. गरोदरपणात नियमित ॲनिमिया तपासणी आणि योग्य वेळी लोहाच्या गोळ्या किंवा सलाईनद्वारे उपचार देणे गरजेचे आहे. संसर्गजन्य आजारांचे योग्य व्यवस्थापन करणेही तितकेच आवश्यक ठरते.

या संशोधनासाठी एका नव्या, पोर्टेबल आणि कमी खर्चाच्या एमआरआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. बालकांचा सर्वांगीण विकास सुरक्षित ठेवण्यासाठी सार्वजनिक आरोग्यामध्ये ॲनिमिया निर्मूलनाला प्राधान्य देणे आता अधिक अनिवार्य बनले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT