सुवा (फिजी) : हवामान बदलामुळे वाढलेल्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी फिजीमधील शेतकरी पुन्हा एकदा आपल्या पूर्वजांच्या पारंपरिक निसर्गज्ञानाकडे वळले आहेत. रानटी कंदमुळे, मधमाशा, पक्षी आणि फळझाडांच्या बदलत्या हालचालींवरून नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यान येणाऱ्या भीषण चक्रीवादळांचा अचूक अंदाज येथील स्थानिक समुदाय अनेक महिने आधीच बांधत आहेत.
फिजीच्या वानुआ लेवू बेटावरील शेतकरी मारिका रादुआ यांच्या मते, जुलै महिन्यात रानटी कंदमुळांचे वेल जमिनीलगत सरपटू लागले, तर जोरदार वाऱ्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी निसर्गाने केलेली ती पूर्वतयारी असते; याचा अर्थ पुढे चक्रीवादळ येणार आहे. याउलट, वेल वरच्या दिशेने वाढल्यास वादळाचा धोका नसतो. याशिवाय चक्रीवादळाच्या तीन-चार महिने आधी गांधीलमाशा जमिनीलगत घरटी बांधतात, एकाच देठाला पाचहून अधिक फणस लागतात आणि केळीचे कोवळे कोंब सरळ न वाढता वाकडे होतात. वादळाच्या एक आठवडा आधी समुद्री पक्षी जमिनीच्या दिशेने खूप खालून उडू लागतात.
आधुनिक विज्ञानाला पारंपरिक ज्ञानाची जोड
प्रशांत महासागरातील हजारो दुर्गम बेटांवर आधुनिक हवामान यंत्रणा पोहोचवणे खर्चिक आणि कठीण आहे. त्यामुळे २०२४ मध्ये फिजी हवामान विभागाने आधुनिक उपग्रह तंत्रज्ञानासोबत पारंपरिक पर्यावरणीय ज्ञानाचा वापर करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.