लंडन : खगोलशास्त्रज्ञांनी अंतराळाच्या अथांग खोलीत एक अत्यंत विस्मयकारक शोध लावला आहे. पृथ्वीपासून तब्बल ११ अब्ज प्रकाशवर्षे दूर असलेल्या एका महाकाय ब्लॅक होल (कृष्णविवर) मधून प्रचंड शक्तिशाली 'यूएफओ' (उष्ण वायूची वादळे) बाहेर पडताना शास्त्रज्ञांनी टिपली आहेत. अवकाशाच्या भाषेत या वादळांना 'अल्ट्रा-फास्ट आऊटफ्लो' म्हटले जाते. ही अत्यंत उष्ण वायूची वादळे ताशी ६७ कोटी मैल (प्रकाशाच्या वेगाच्या तब्बल १० ते ३० टक्के) या अद्भूत वेगाने विश्वात प्रवास करत आहेत.
गॅलेक्सीचा विकास रोखण्याची ताकद
‘डब्ल्यूआयएसएसएच १३’ नावाच्या एका अत्यंत प्राचीन आणि अवाढव्य क्वासारचा (सक्रिय ब्लॅक होल) अभ्यास करताना हा शोध लागला. शास्त्रज्ञांच्या मते, हे वायूचे झोत इतके शक्तिशाली आहेत की, ते नवीन तारे तयार होण्यासाठी लागणारा वायू गरम करून गॅलेक्सीच्या (दीर्घिका) बाहेर फेकून देतात. परिणामी, संपूर्ण गॅलेक्सीचा विकास मंदावू शकतो किंवा पूर्णपणे थांबू शकतो.
एक्सएमएम-न्यूटन आणि एनयूयूस्टारची कामगिरी
युरोपियन स्पेस एजन्सीच्या 'एक्सएमएम-न्यूटन' आणि नासाच्या 'एनयूस्टार' या दोन आधुनिक स्पेस टेलिस्कोपच्या मदतीने हा डेटा गोळा करण्यात आला आहे. २०१७ आणि २०२४ मधील निरीक्षणांची तुलना केली असता शास्त्रज्ञांना असे आढळले की, पहिला संथ प्रवाह हा प्रवाहाचा बाहेरील भाग असून तो स्थिर आहे. (प्रकाशाच्या वेगाच्या १० टक्के ), दुसरा वेगवान प्रवाह हा अतिशय वेगवान मुख्य गाभा आहे, जो अचानक उसळतो आणि नाहीसा होतो (प्रकाशाच्या वेगाच्या ३०%).
दरवर्षी ४० सूर्यांचे वजन नष्ट
हे कृष्णविवर अत्यंत वेगाने आजूबाजूचे पदार्थ गिळंकृत करत असून, या प्रक्रियेत दरवर्षी तब्बल ४० सूर्यांच्या वजनाइतके साहित्य अवकाशात फेकले जात आहे. याआधी असे शोध घेण्यासाठी इतर गॅलेक्सीच्या गुरुत्वाकर्षणाचा आधार घ्यावा लागायचा; पण यावेळी थेट अचूक निरीक्षण करण्यात यश आले आहे. विश्वाच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात गॅलेक्सी कशा विकसित झाल्या, हे समजून घेण्यासाठी हा शोध मैलाचा दगड ठरणार आहे.