विश्वसंचार

बटाटे, भाताने वजन वाढते?

Arun Patil

नवी दिल्ली : बटाटे किंवा भाताच्या सेवनाने वजन वाढते असा एक समज आहे. खरे तर 'अति सर्वत्र वर्जयेत' हे लक्षात ठेवूनच आहाराकडे पाहायला हवे. आहारतज्ज्ञांच्या मते, बटाटा किंवा भात खाल्ल्याने वजन वाढतेच असे नाही. उलटपक्षी या दोन्ही पदार्थांमध्ये पोषक घटक असल्याने ते खाणेच हितावह ठरते.

बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेटस् आणि स्टार्च मुबलक प्रमाणात असतात, हे खरं आहे. परंतु हेदेखील खरं आहे, की बटाट्यामध्ये प्रतिकारशक्ती वाढवणारे व्हिटॅमिन सी आणि फायबर्सदेखील भरपूर प्रमाणात असतात. युनायटेड स्टेटस् डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅग्रीकल्चरने दिलेल्या माहितीनुसार, बटाट्याच्या 100 ग्रॅम भागामध्ये दोन ग्रॅम फायबर आणि दोन ग्रॅमपर्यंत प्रोटिन असतात. इतकेच नाही तर हे कमी कॅलरी फूडदेखील आहे. प्रोटिनमुळे तो वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम अन्न पर्याय आहे.

वजन कमी करण्यासाठी आहारात बटाट्यांचा समावेश करता येऊ शकतो. त्यासाठी सर्वप्रथम बटाटे चांगले उकडून घ्यावे लागतील, जेणेकरून त्यातून स्टार्च बाहेर येईल. तसेच बटाटे कमी तेलात शिजवावेत. अतिशय पौष्टिक मानल्या जाणार्‍या भाज्यांमध्ये बटाटे मिसळून खावेत. वजन कमी करण्यासाठी काही जण भात खाणेही बंद करतात. बटाट्यांप्रमाणेच भातामध्येही स्टार्च आणि कार्ब्जचे प्रमाण जास्त असते. भात पचायला खूप सोपा असतो. यामुळेच भात खाल्ल्याने शरीरात चरबी जमा होत नाही. दररोज मर्यादित प्रमाणात भात खाऊ शकता. तसेच भात करताना तांदूळ उकळणे आणि त्यातील स्टार्च काढण्यासाठी उरलेले पाणी काढून टाकणे, ही एक चांगली पद्धत आहे.

SCROLL FOR NEXT