बीजिंग : आपल्या रोजच्या जेवणातील अविभाज्य घटक असलेले टोमॅटो आणि बटाटे यांच्यातील नाते केवळ स्वयंपाकघरापुरते मर्यादित नाही, तर ते कोट्यवधी वर्षांपूर्वीचे जनुकीय नाते आहे. एका आश्चर्यकारक वैज्ञानिक शोधात, शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केले आहे की, बटाट्याची ‘जननी’ दुसरी तिसरी कोणी नसून टोमॅटो आहे. सुमारे 90 लाख वर्षांपूर्वी एका प्राचीन वनस्पती संकरातून बटाट्याचा जन्म झाला, जो आज जगातील तिसरे सर्वात मोठे मुख्य पीक आहे. चीनमधील ‘अॅग्रीकल्चरल जीनोमिक्स इन्स्टिट्यूट इन शेन्झेन’, ‘चायनीज अॅकॅडमी ऑफ अॅग्रीकल्चरल सायन्सेस’ आणि कॅनडा व यूके येथील शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय पथकाने हे संशोधन केले आहे. या संशोधनामुळे बटाट्याच्या अनुवांशिक पैदास (जेनेटिक ब्रिडिंग) क्षेत्राला एक नवीन आणि क्रांतिकारी दिशा मिळाली आहे.
या संशोधनाचे नेतृत्व करणारे शास्त्रज्ञ हुआंग सॅनवेन सांगतात की, बटाट्याचा उगम शास्त्रज्ञांसाठी नेहमीच एक कोडे राहिले होते. बटाट्याचे रोप ‘इट्युबेरोसम’ नावाच्या वनस्पतीसारखे दिसते, ज्याला कंद येत नाहीत. मात्र, जनुकीय विश्लेषणात बटाटा हा टोमॅटोच्या कुळातील असल्याचे दिसून येत होते. हेच कोडे सोडवण्यासाठी शास्त्रज्ञांनी बटाट्याची एक व्यापक ‘डीएनए पितृत्व चाचणी’ केली. लागवडीखालील बटाटे आणि त्यांच्या 56 जंगली प्रजातींच्या 101 जीनोम आणि 349 नमुन्यांचे विश्लेषण केले. यातून त्यांना आढळले की, तपासलेल्या प्रत्येक बटाट्यामध्ये टोमॅटो आणि इट्युबेरोसम या दोन्ही वनस्पतींचे जनुकीय गुणधर्म स्थिर आणि संतुलित प्रमाणात आहेत. यावरून त्यांनी निष्कर्ष काढला की, बटाटा हा या दोन वनस्पतींच्या संकरातून तयार झालेला वंशज आहे.
संशोधनानुसार, टोमॅटो ही बटाट्याची ‘मातृ वनस्पती’ (मॅटर्नल पेरेंटस्) होती, तर इट्युबेरोसम ही ‘पितृ वनस्पती’ (पॅटर्नल पेरेंटस्) होती. सुमारे 1.4 कोटी वर्षांपूर्वी टोमॅटो आणि इट्युबेरोसम एकमेकांपासून वेगळे झाले. त्यानंतर सुमारे 50 लाख वर्षांनी, म्हणजेच आजपासून 90 लाख वर्षांपूर्वी, या दोन्हींमध्ये संकर घडून आला आणि त्यातून पहिल्या कंदयुक्त बटाट्याच्या वनस्पतीचा उदय झाला. संशोधनातील निष्कर्षाविषयी हुआंग सॅनवेन यांनी सांगितले की, बटाटा हा टोमॅटो आणि इट्युबेरोसम या दोन वेगळ्या वनस्पतींच्या संकरातून निर्माण झाला आहे. यामध्ये टोमॅटोने मातृ वनस्पतीची भूमिका बजावली. त्यामुळे टोमॅटो ‘आई’, इट्युबेरोसम ‘वडील’ आहेत. बटाट्याला येणारा ‘कंद’ हा दोन्ही पालक वनस्पतींकडून मिळालेल्या जनुकांच्या विशिष्ट संयोगामुळे तयार झालेला एक पूर्णपणे नवीन अवयव आहे. या शोधामुळे बटाट्याच्या अधिक पौष्टिक आणि विविध वातावरणात टिकणार्या प्रजाती विकसित करण्यास मदत होईल.
बटाट्याच्या दोन्ही पालक वनस्पतींना कंद येत नसताना बटाट्याला कंद कसे येतात? टोमॅटोला जमिनीखाली कंद नसतात आणि इट्युबेरोसमला जमिनीखाली खोड असले, तरी त्याला फुगलेले कंद नसता, असा प्रश्न शास्त्रज्ञांना पडला होता. त्याविषयी हुआंग सॅनवेन सांगतात, ‘कंद’ हे जनुकीय पुनर्रचनेचे फलित आहे. जेव्हा दोन्ही वनस्पतींमध्ये संकर झाला, तेव्हा त्यांच्या जनुकांची अशाप्रकारे पुनर्रचना झाली की, त्यातून अपघाताने ‘कंद’ या नवीन अवयवाची निर्मिती झाली. टोमॅटोकडून मिळालेले जनुक (एसपी6) बटाट्यामध्ये कंद तयार करण्याची प्रक्रिया सुरू करणारे ‘मास्टर स्विच’ ठरले. जमिनीखालील खोडांची (स्टोलोन) वाढ नियंत्रित करणारे आयटी 1 हे जनुक इट्युबेरोसमकडून मिळाले. या दोन्ही जनुकांच्या योग्य संयोगाशिवाय बटाट्यामध्ये कंद तयार होणे शक्य नव्हते. कंद विकसित झाल्यामुळे बटाट्याला अत्यंत कठीण परिस्थितीत टिकून राहण्यास मोठी मदत झाली. यामुळे बटाट्याच्या नवनवीन प्रजाती निर्माण झाल्या.