नवी दिल्ली; वृत्तसंस्था : प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला काही दिवस उरले असतानाच शनिवारी गुप्तचर यंत्रणांनी मोठा इशारा दिला आहे. खलिस्तानी संघटना आणि बांगला देशातील दहशतवादी गट दिल्लीसह देशातील इतर अनेक शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करू शकतात, असे या अलर्टमध्ये म्हटले आहे.
परदेशातून कार्यरत असलेले खलिस्तानी आणि कट्टरपंथी हँडलर्स पंजाबमधील गुंडांचा वापर फूट सोल्जर्स (प्यादे) म्हणून करत आहेत. हे गुंड हरियाणा, दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये सक्रिय असून ते खलिस्तानी दहशतवादी घटकांशी संबंध प्रस्थापित करत आहेत.
26 जानेवारीला होणार्या प्रजासत्ताक दिन संचलनाच्या पार्श्वभूमीवर उत्तर जिल्हा पोलिसांनी विविध गर्दीच्या आणि संवेदनशील ठिकाणी मॉक ड्रिल्स (सुरक्षा सराव) आयोजित केले आहेत. विविध सुरक्षा यंत्रणांची तयारी आणि आपत्कालीन परिस्थितीत त्यांचा प्रतिसाद देण्याचा वेळ तपासण्यासाठी हा सराव करण्यात आला.
संवेदनशील ठिकाणी मॉक ड्रिल
जानेवारी 2026 च्या पहिल्या पंधरवड्यात उत्तर दिल्लीतील खालील महत्त्वाच्या ठिकाणी चार मॉक ड्रिल्स घेण्यात आले. या सरावांचा उद्देश दहशतवादविरोधी उपाययोजना वाढवणे आणि संभाव्य घटनांच्या वेळी सार्वजनिक आणि सरकारी संस्थांना सतर्क करणे हा होता.