Portugal Giant Battery | डोंगराला विशाल बॅटरीमध्ये बदलण्याची पोर्तुगालची योजना  
विश्वसंचार

Portugal Giant Battery | डोंगराला विशाल बॅटरीमध्ये बदलण्याची पोर्तुगालची योजना

जमीन ३ कि.मी. खोल उकरून हवा भरण्याचे प्रयोग; अनेक शहरे उजळणार

पुढारी वृत्तसेवा

लिस्बन : युरोपमधील पोर्तुगाल देश सध्या ऊर्जेची बचत करण्यासाठी एका भल्यामोठ्या आणि अनोख्या प्रकल्पावर काम करत आहे. अक्षय ऊर्जेच्या माध्यमातून तयार झालेली वीज, जेव्हा विजेची मागणी कमी असते, तेव्हा साठवून ठेवण्यासाठी तेथील तज्ज्ञ एक नवीन मार्ग शोधत आहेत. ‘नोव्हा युनिव्हर्सिटी लिस्बन’ आणि ‘डोम लुईझ इन्स्टिट्यूट’चे संशोधक जमिनीखालील नैसर्गिक खडकांचा वापर दाबयुक्त हवा (Compressed Air) साठवण्याचे गोदाम म्हणून करण्याच्या शक्यतेवर अभ्यास करत आहेत. या योजनेंतर्गत जमिनीखाली तब्बल ३ किलोमीटर (१.९ मैल) खोलीपर्यंत हवा पंप करून संपूर्ण आयबेरियन द्वीपकल्प (Iberian Peninsula) एका महाकाय बॅटरीमध्ये बदलण्याचे उद्दिष्ट आहे.

या तंत्रज्ञानानुसार, वाळूचा खडक किंवा चुनखडक यांसारख्या खडकांच्या कणांमधील सूक्ष्म पोकळ्यांचा वापर हवा साठवण्यासाठी केला जाईल. जेव्हा अतिरिक्त विजेची निर्मिती होईल, तेव्हा त्या विजेचा वापर करून हवा कॉम्प्रेस केली जाईल आणि खडकांच्या या पोकळ्यांमध्ये भरली जाईल. हवेच्या प्रचंड दाबामुळे खडकांच्या छिद्रांमध्ये असलेले खारे पाणी बाहेर ढकलले जाईल. भविष्यात मागणी वाढेल तेव्हा वापरता यावी, म्हणून ही न वापरलेली अक्षय ऊर्जा अशा प्रकारे साठवून ठेवली जाणार आहे. साठवलेल्या ऊर्जेची जेव्हा गरज भासेल, तेव्हा ती दाबयुक्त हवा जमिनीच्या पृष्ठभागावर परत आणली जाईल.

हवेच्या या वेगामुळे टर्बाइन फिरवून पुन्हा वीज निर्माण केली जाईल. अभ्यासानुसार, जर हे गोदाम जमिनीखाली ३ कि.मी. खोल असेल, तर आदर्श परिस्थितीत याची कमाल क्षमता १ टॅराव्हॉट-अवर (1 TWh) असू शकते. अर्थात, हा अत्यंत सकारात्मक परिस्थितीवर आधारित एक जास्तीत जास्त क्षमतेचा अंदाज आहे. या प्रकल्पासाठी संशोधक विशेषतः लिस्बन आणि एवेइरो दरम्यान असलेल्या ‘लुसिटेनियन बेसिन’वर लक्ष केंद्रित करत आहेत, जिथे अशा प्रकारची भूवैज्ञानिक रचना उपलब्ध आहे. ही यंत्रणा ‘ब्लॅक स्टार्ट’ क्षमतादेखील देऊ शकते; म्हणजेच मुख्य ग्रीडमधून वीज न घेताही पॉवर ग्रीडचे काही भाग पुन्हा सुरू करण्यास मदत करू शकते.

हे तंत्रज्ञान व्यावसायिक वापरासाठी सध्या तरी बरेच दूर आहे. या अभ्यासातील तज्ज्ञ रिकार्डो परेरा यांच्या मते, याच्या पूर्ण विकासासाठी ५ ते १० वर्षे लागू शकतात. यासाठी सखोल भूवैज्ञानिक अभ्यास, ड्रिलिंग आणि पायलट प्रोजेक्टस्‌ची गरज भासेल. शिवाय, पोर्तुगालला या प्रकारच्या ऊर्जा साठवणुकीसाठी एक नवीन कायदेशीर चौकटही तयार करावी लागेल. त्यामुळे नजीकच्या काळात यापासून थेट फायदा मिळण्याची अपेक्षा नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT