Pomegranate Health Benefits | डाळिंबाचे सेवन गंभीर आजारांना ठेवते दूर 
विश्वसंचार

Pomegranate Health Benefits | डाळिंबाचे सेवन गंभीर आजारांना ठेवते दूर

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्‍ली : ‘रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरांना दूर ठेवा’ ही म्हण आपण अनेकदा ऐकतो. परंतु, आयुर्वेदापासून ते आधुनिक वैद्यकीयशास्त्रापर्यंत अत्यंत उच्च स्थान मिळालेले ‘डाळिंब’ हे फळही आरोग्यासाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. गडद लाल रंगाचे डाळिंबाचे दाणे केवळ स्वादिष्टच नसतात, तर ते शरीराला अनेक गंभीर आजारांपासून वाचवण्यास मदत करतात. काही वैद्यकीय संशोधनांनुसार, डाळिंबाचे नियमित सेवन मानवी शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.

डाळिंबामध्ये शरीराला आवश्यक असणारी बहुतांश पोषक तत्त्‍वे मुबलक प्रमाणात आढळतात. यामध्ये प्रामुख्याने व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-के आणि व्हिटॅमिन-बी कॉम्प्लेक्स ही जीवनसत्त्व‍े पोटॅशियम, मॅग्‍नेशियम, फॉस्फरस आणि लोह ही खनिजे आढळतात. पचनक्रिया सुलभ करण्यासाठी डाळिंबातील फायबर अत्यंत महत्त्वाचे ठरते. डाळिंबाच्या रसाचे नियमित सेवन केल्याने रक्तवाहिन्यांमधील कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि उच्च रक्तदाबाची पातळी नियंत्रित राहते. परिणामी, हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो.

संशोधनानुसार, डाळिंबामध्ये ‘प्युनिकालागिन्स’ नावाचे शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंटस्‌ असतात. हे घटक शरीरातील कर्करोगाच्या (विशेषतः प्रोस्टेट आणि स्तनाचा कर्करोग) पेशींची वाढ रोखण्यास मदत करतात. वाढत्या वयासोबत येणारा विसरभोळेपणा किंवा ‘अल्झायमर्स’सारख्या मेंदूच्या आजारांवर डाळिंब फायदेशीर ठरते. यातील पॉलिफेनॉल्स मेंदूच्या पेशींचे रक्षण करतात आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण बनवतात. या फळातील अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्मांमुळे शरीराची संसर्गाविरुद्ध लढण्याची क्षमता वाढते. तोंडातील जंतू आणि हिरड्यांच्या समस्यांवरही डाळिंब खाणे गुणकारी आहे. डाळिंबामध्ये लोहाचे प्रमाण चांगले असल्याने शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते. यामुळे ॲनिमिया किंवा रक्ताची कमतरता असलेल्या रुग्णांना रोज डाळिंब खाण्याचा सल्ला दिला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT