लंडन : विष म्हटलं की बहुतेकांच्या डोळ्यांसमोर लगेच सायनाइड येतं. सायनाइड खरंच अतिशय घातक विष मानले जाते, पण तुम्हाला माहीत आहे का की याहूनही अधिक जीवघेणे एक विष अस्तित्वात आहे? याचं नाव आहे पोलोनियम-210. याबद्दल फार थोड्याच लोकांना माहिती आहे. पोलोनियम-210 हे एक अत्यंत रेडियोधर्मी (Radioactive) तत्त्व आहे. याची केवळ 1 ग्रॅम मात्रा हजारो लोकांचा जीव घेऊ शकते आणि त्यामुळे याला जगातील सर्वात धोकादायक विष मानले जाते.
याची एक विशेष धोकादायक बाब म्हणजे यामध्ये ना गंध असतो, ना चव, त्यामुळे हे ओळखणे अत्यंत कठीण असते. जर कोणी याला अन्न किंवा पाण्यात मिसळले, तर कोणालाही त्याचा पत्ता लागत नाही. हे विष शरीरात गेल्यानंतर आतून हळूहळू रेडिएशन सोडते, जे शरीरातील विविध अवयवांवर हळूहळू परिणाम करते. हे डीएनए आणि रोग प्रतिकारशक्ती प्रणाली दोन्ही नष्ट करते. परिणामी, अत्यंत वेदनादायक आणि जलद मृत्यू होतो.
या धोकादायक विषाचे नाव ‘पोलोनियम’ असे ठेवण्यात आले कारण याचा शोध पोलंडच्या प्रसिद्ध शास्त्रज्ञ मेरी क्युरी यांनी लावला होता. 1898 साली, त्यांनी पोलोनियम आणि रेडियम या दोन्ही रेडियोधर्मी घटकांचा शोध लावला आणि या संशोधनासाठी त्यांना भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाले. पोलोनियम-210 हे आजही अनेकदा गुप्त हत्या किंवा जासूसी कारवायांमध्ये वापरले जाणारे एक अत्यंत धोकादायक रसायन म्हणून ओळखले जाते. त्याच्या विषारीपणामुळे, कोणत्याही सुरक्षा व्यवस्थेच्या पलीकडे जाऊन याचा उपयोग सहज करता येतो म्हणूनच हे विष अधिक भीतीदायक मानले जाते.