कोलकाता : सध्या भारताबरोबरच अवघ्या जगालाही हवेच्या प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. 'इनडोअर' आणि 'आऊटडोअर' अशा दोन्ही प्रकारच्या प्रदूषणामुळे लोकांच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होत आहे. भारतात होणार्या मृत्यूंमागे प्रदूषण हेही एक मोठे कारण आहे. आता 'आऊटडोअर' म्हणजेच घराबाहेरचे हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथील 'सीएसआयआर' संस्थेशी निगडीत केंद्रीय मेकॅनिकल इंजिनिअरिंग संशोधन संस्थेने एक 'एअर प्युरिफायर' विकसित केला आहे.
या संस्थेचे संचालक प्राध्यापक डॉ. हरिश हिरानी यांनी सांगितले की हा एअर प्युरिफायर पाच मीटरच्या वर्तुळातील हवा शुद्ध करू शकतो. हवेतील प्रदूषकांना तो 50 टक्क्यांपर्यंत कमी करतो. जर एखाद्या विशिष्ट वेळेत हवेचे प्रदूषण कमी करायचे असेल तर त्यासाठी यामध्ये 'टायमर'चीही सुविधा आहे. हा प्युरिफायर तयार करण्यासाठी 25 ते 30 हजार रुपयांचा खर्च येऊ शकतो. त्याचे संचालन सौरऊर्जेच्या माध्यमातून केले जाऊ शकते. हे यंत्र रस्त्याच्या कडेलाही ठेवता येऊ शकते. त्यामुळे वाहनांमुळे होणारे हवेचे प्रदूषण कमी करण्यास मदत मिळेल.