न्यूयॉर्क : गडद काळ्या आणि पिवळ्या रंगाचा हा चिमुकला बेडूक दोन कारणांसाठी चर्चेत असतो. पहिले म्हणजे तो जहाल विषारी बेडूक आहे आणि दुसरे म्हणजे त्याची मोठ्या प्रमाणात तस्करी होते. या बेडकाला आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल दीड लाख रुपये किंमत मिळते!
या बेडकाचे नाव आहे 'पॉयझन डार्ट फ्रॉग'. या प्रजातीचे बेडूक नारंगी, चमकदार हिरवे किंवा निळ्या रंगाचेही असू शकतात. त्यांचे विष इतके जहाल असते की ते दहा लोकांनाही मृत्यूच्या जबड्यात पाठवू शकते. हे बेडूक सहा सेंटीमीटर लांबीचे असतात आणि त्यांचे वजन अवघे तीस ग्रॅम असते. ब—ाझील, इक्वाडोर, व्हेनेझुएला, बोलिव्हिया, कोस्टारिया, पनामा, गयाना आणि हवाईच्या जंगलांमध्ये हे बेडूक आढळतात. या प्रजातीचे नर बेडूक मादीने दिलेली अंडी झाडाची मुळे, पाने आणि ओलसर जागेत लपवून ठेवतात. अंड्यातून पिल्ली बाहेर येईपर्यंत तेच अंड्यांची देखभाल करतात. या बेडकांचे चमकदार रंग आणि त्यांचे विष यासाठी त्यांची तस्करी केली जाते. त्यामुळेच हे बेडूक धोका असलेल्या प्राण्यांच्या यादीत समाविष्ट आहेत. या बेडकाच्या विषापासून वेदनाशामक औषधे बनवली जातात.