Platypus-like Creature | चीनमध्ये १६.८ कोटी वर्षांपूर्वी वावरत होता प्लॅटिपससारखा प्राणी 
विश्वसंचार

Platypus-like Creature | चीनमध्ये १६.८ कोटी वर्षांपूर्वी वावरत होता प्लॅटिपससारखा प्राणी

पुढारी वृत्तसेवा

बीजिंग : चीनच्या इनर मंगोलिया प्रदेशातील प्राचीन गोड्या पाण्याच्या तलावांमध्ये आणि नद्यांमध्ये १६.८ कोटी ते १६.३ कोटी वर्षांपूर्वी, म्हणजेच मध्य-जुरासिक युगात, डायनासोरच्या काळात प्लॅटिपससारखा (Platypus) एक विचित्र प्राणी अधिवास करत होता. नव्याने शोधण्यात आलेला हा प्राणी जुरासिक युगातील आजवर ज्ञात असलेला सर्वात मोठा सस्तन प्राण्याचा पूर्वज ठरला आहे; तरीही त्याचे वजन एखाद्या चिहुआहुआ प्रजातीच्या कुत्र्याइतकेच होते.

अर्ध-जलीय जीवनशैली जगणारा हा सस्तन प्रकारचा आजवरचा सर्वात जुना प्राणी मानला जात आहे. वैज्ञानिकांनी २०१६ मध्ये या प्राण्याचे अत्यंत नाजूक आणि सुस्पष्ट जीवाश्म उत्खननात शोधून काढले होते. अभ्यासानुसार, या प्राण्याचे वजन सुमारे १ ते २ किलोग्रॅम (२.२ ते ४.४ पौंड) दरम्यान असावे. जुरासिक युगातील सस्तन प्राण्यांच्या पूर्वजांचा विचार करता हा आकार मोठा मानला जातो. या प्राण्याचे नाव ‘मेगाकॉडा सनगेई’ (Megacauda sungei) असे ठेवण्यात आले असून, हे नाव त्याच्या मोठ्या शेपटीवरून पडले आहे. (‘मेगाकॉडा’ म्हणजे मोठी शेपटी). या संशोधनाचा सविस्तर अहवाल ‘नेचर’ या प्रसिद्ध नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.

या प्राण्यामध्ये आधुनिक काळातील विविध प्राण्यांचे शारीरिक गुणधर्म एकत्र पाहायला मिळतात. त्याची रुंद आणि चपटी शेपटी तो एक उत्तम पोहणारा असल्याचे दर्शवते, तर त्याचे मागचे पाय लहान आणि पावले लांब होती. हा प्राणी नद्या आणि तलावांमध्ये ‘सॅलॅमँडर’ प्राण्यांची शिकार करत असावा. या अभ्यासाचे सहलेखक आणि युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो येथील पुराजीवशास्त्रज्ञ झे-शी लुओ यांनी सांगितले की, ‘हा प्राणी एखाद्या ‘कायमेरा’सारखा (Chimera - वेगवेगळ्या प्राण्यांच्या अवयवांनी बनलेला काल्पनिक प्राणी) दिसतो.

या प्राण्याचा मागील भाग आणि पाय हुबेहूब प्लॅटिपससारखे आहेत, ज्यांच्या मदतीने तो पोहू शकत होता किंवा नदीच्या पात्रात बिळे तयार करू शकत होता.’ परंतु, त्याचे दात मात्र प्लॅटिपससारखे नव्हते. त्याला मजबूत सुळे आणि अन्न चावून खाण्यासाठी विशेष दाढा होत्या, ज्या आधुनिक मांसाहारी सस्तन प्राण्यांपेक्षा वेगळ्या पद्धतीने मांस कापण्यास मदत करत असत. ‘हा अतिशय विशाल आणि विशिष्ट प्रकारचे सुळे असलेला एक शिकारी प्राणी होता. त्यामुळे तो काही प्रमाणात उदमांजर आणि काही प्रमाणात प्लॅटिपससारखा दिसतो,’ असे लुओ यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT