विश्वसंचार

चीनमध्ये मांजरांचीही प्लास्टिक सर्जरी!

Arun Patil

बीजिंग : चीन्यांच्या अजब देशातील हे नवे अजब! बेडूक, साप, किडे, ऑक्टोपस, वटवाघूळ असे काहीही खाणारे चिनी प्राण्यांबाबत किती सजगतेने विचार करीत असतील, याची आपण कल्पना करू शकतो. तिथे आता चक्क पाळीव प्राण्यांचीही प्लास्टिक सर्जरी केली जात आहे. मिकी माऊससारखे कान असावेत म्हणून मांजरांची प्लास्टिक सर्जरी करण्याचे धक्कादायक प्रकार तिथे उघडकीस आले असून, पशुप्रेमी संघटनांनी त्यावर टीकेची झोड उठवली आहे.

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार चीनमधील लोक आपल्या पाळीव प्राण्यांचे, विशेषतः मांजरांचे कान कार्टून कॅरेक्टर मिकी माऊसच्या कानासारखे करवून घेत आहेत. यामुळे प्राण्यांना केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक समस्यांनाही सामोरे जावे लागत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पाळीव प्राण्यांची अशी प्लास्टिक सर्जरी तत्काळ बंद करावी असे अनेक तज्ज्ञांनी म्हटले आहे.

प्राण्यांच्या एका क्लिनिकबाहेरची जाहिरात काही लोकांच्या निदर्शनास आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. या जाहिरातीचे वृत्त सर्वत्र पसरताच प्राणीप्रेमींनी रस्त्यावर उतरून निषेध केला. विशेष म्हणजे चीनमध्ये अशा प्रकारच्या सर्जरीवर बंदी आहे; मात्र गुपचूपपणे अशा शस्त्रक्रिया केल्या जात असतात. संबंधित क्लिनिक केवळ 40 डॉलर्स म्हणजेच 3300 रुपये खर्चात अशा कॉस्मेटिक सर्जरीची ऑफर देऊन लोकांचे लक्ष वेधून घेत होते.

SCROLL FOR NEXT