plasma collector space debris | ‘प्लाझ्मा कलेक्टर’ काढणार अवकाशातील वाढता कचरा  Pudhari File Photo
विश्वसंचार

plasma collector space debris | ‘प्लाझ्मा कलेक्टर’ काढणार अवकाशातील वाढता कचरा

पुढारी वृत्तसेवा

टोकिओ : पृथ्वीच्या कक्षेत निकामी झालेले उपग्रह, रॉकेटचे भाग तसेच उपग्रह आणि रॉकेटचे टक्कर होऊन झालेले तुकडे यांचा कचरा अवकाशात वाढत चालला आहे. भविष्यात यामुळे अंतराळ प्रवास अधिक धोकादायक ठरू शकतो. या ‘ऑर्बिटल डेब्रिस’ला (अवकाशातील कचरा) काढण्यासाठी अभियंते आणि शास्त्रज्ञ विविध संकल्पनांवर प्रयोग करत आहेत. यापैकीच एक नवीन कल्पना जपानमधील एका संशोधन चमूने मांडली आहे. प्लाझ्मा इंजिनचा वापर करून कचरा न पकडता, केवळ हलके ढकलून त्याला कक्षेतून बाहेर काढणे, अशीही नवीन संकल्पना आहे.

जाळे वापरून कचरा संकलित करण्याऐवजी, ही नवीन प्रणाली एका विशेष आकाराच्या प्लाझ्मा बीमवर अवलंबून असेल, जो कचरारूपी वस्तूंचा वेग कमी करेल. यामुळे त्या वस्तू पृथ्वीच्या वातावरणात परत येतील आणि जळून जातील. हा द़ृष्टिकोन अजूनही प्रायोगिक टप्प्यात असला तरी, नुकत्याच झालेल्या प्रयोगशाळेतील निकालातील निष्कर्षातून ‘केस्लर सिंड्रोम’ (टकरींची साखळी प्रतिक्रिया) म्हणून ओळखल्या जाणार्‍या धोक्याला कमी करण्यासाठी एक मार्ग दाखवला आहे.

‘बाय-डायरेक्शनल प्लाझ्मा थ्रस्टर’

कचरा कसा काढेल?

तोहोकू विद्यापीठातील काझुनोरी ताकाहाशी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी एक बाय-डायरेक्शनल प्लाझ्मा थ्रस्टर (दुहेरी दिशेने प्लाझ्मा उत्सर्जित करणारे इंजिन) विकसित केले आहे. हे इंजिन विरुद्ध दिशांना चार्ज केलेले कण उत्सर्जित करते. त्यातील पहिला प्रवाह कचरा काढणार्‍या वाहनाला (क्लिनअप व्हेईकल) योग्य दिशेने चालविण्यासाठी आवश्यक ‘धक्का’ (थ्रस्ट) देतो. दुसरा प्रवाह (काऊंटर डायरेक्टेड स्टे्रम) जवळच्या कचर्‍यावर आदळून त्याला हळू करतो. या पद्धतीमध्ये कचर्‍याला थेट स्पर्श करण्याची गरज लागत नाही. प्लाझ्मा बीम इलेक्ट्रोमॅग्नेटिक क्रियेद्वारे गती हस्तांतरित करतो. यामुळे नाजूक वस्तू तुटून त्याचे हजारो छोटे धोकादायक तुकडे होण्याची शक्यता कमी होते. पेंटच्या लहान कणांपासून ते मोठ्या मृत उपग्रहांपर्यंत विविध आकाराच्या कचर्‍यासाठी ही बिन-संपर्क (नॉनकनेक्ट) पद्धत आकर्षक आहे.

ताकाहाशी यांनी 2018 मध्ये या थ्रस्टरचा प्राथमिक नमुना सादर केला होता, जो खूप लहान कचर्‍याच्या कणांवर परिणाम करू शकत होता, पण मोठ्या लक्ष्यांसाठी तो अपुरा पडत होता. नवीनतम सुधारणांमध्ये फ्यूजन संशोधनातील संकल्पनांचा वापर करण्यात आला आहे - विशेषतः, ‘कस्प मॅग्नेटिक फील्ड’ नावाची चुंबकीय रचना. या कस्प फील्डमुळे प्लाझ्माच्यो गती हस्तांतरणाची कार्यक्षमता सुधारते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT