वॉशिंग्टन ः कॅलिफोर्नियाच्या किनार्याजवळ, मॉन्टेरे कॅनियनच्या गाळात, 10,700 फुटांपेक्षा (3,300 मीटर) जास्त खोलीवर निळे डोळे आणि दाढीसारखे अवयव असलेला एक गुलाबी रंगाचा, टणक मासा पोहताना दिसला आहे. मॉन्टेरे बे अॅक्वेरिअम रिसर्च इन्स्टिट्यूट (MBARI) च्या संशोधकांच्या गटाने कॅमेर्यात कैद केलेला हा अनोखा ‘स्नेलफिश’ तीन नवीन स्नेलफिश प्रजातींपैकी एक आहे. हे मासे समुद्राच्या खोलवर, जिथे सतत अंधार असतो आणि खूप दाब असतो, तिथे राहतात.
स्नेलफिश त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे खोल समुद्रातील इतर जीवांपेक्षा वेगळे मानले जातात. काही स्नेलफिशच्या पोटाला ‘सक्शन कप’ असतो, ज्यामुळे ते खडकांना चिकटून राहू शकतात किंवा इतर प्राण्यांच्या मदतीने प्रवास करू शकतात. 400 पेक्षा जास्त ज्ञात प्रजाती असलेले स्नेलफिश, समुद्रातील उथळ भागांपासून ते खोल खड्ड्यांपर्यंत अनेक ठिकाणी आढळतात. हे मासे केवळ परिसंस्थेचा एक महत्त्वाचा भाग नाहीत, तर ते आपल्याला खोल समुद्रातील उत्क्रांतीचा अभ्यास करण्याची संधी देतात, असे स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कमधील जीवशास्त्रज्ञ प्रा. मॅकेन्झी गेरिंगर यांनी सांगितले.
गेरिंगर पुढे म्हणतात, उथळ पाण्यातील स्नेलफिशची त्यांच्या खोल समुद्रातील नातेवाइकांशी तुलना करून, आपण खोल समुद्रातील जीवनासाठी कोणत्या प्रकारचे बदल आवश्यक आहेत, हे अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. 2019 मध्ये संशोधकांना एक गुलाबी रंगाचा, ‘टणक’ स्नेलफिश (Careproctus colliculi) मॉन्टेरे कॅनियनमध्ये रिमोट-ऑपरेटेड व्हेईकलचा वापर करून आढळला. त्याच वर्षी ‘अल्विन’ ( Alvin) नावाच्या मानवी पाणबुडीने 13,100 फूट (4,000 मी.) खोलीवर आणखी दोन नवीन स्नेलफिश प्रजाती शोधल्या : पूर्णपणे काळा ‘डार्क स्नेलफिश’ (Careproctus yanceyi) आणि ‘स्लीक स्नेलफिश’ (Paraliparis em), ज्याला सक्शन डिस्क नव्हती. स्नेलफिशना एकमेकांपासून वेगळे ओळखणे एक कोड्यासारखे आहे. गेरिंगर म्हणाले, आम्ही अनेक वैशिष्ट्ये काळजीपूर्वक तपासत आहोत, जसे की मणक्यांची संख्या, पंखांची रचना, संवेदी छिद्रांची स्थिती आणि काही प्रजातींमध्ये पोटाला चिकटण्यासाठी वापरल्या जाणार्या विशेष सक्शन डिस्कचा आकार. संशोधकांनी नवीन नमुन्यांची इतर ज्ञात स्नेलफिश प्रजातींशी तुलना करण्यासाठी मोजमापे, विविध वैशिष्ट्ये आणि आनुवंशिक माहिती गोळा केली. प्रत्येक नवीन पुराव्यासह हे स्पष्ट झाले की, हे तिन्ही मासे विज्ञानाला आजवर अज्ञात असलेले नवीन प्रजाती होते, असे गेरिंगर यांनी सांगितले.