बीजिंग : सध्याचा जमाना नॅनोटेक्नॉलॉजीचा आहे. अशा काळात चक्क हायड्रोजन बंधांचेही छायाचित्र टिपण्यात यश आलेले आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? अब्जांश तंत्रज्ञान म्हणजेच नॅनो तंत्रज्ञानात जगात आघाडीवर असलेल्या चीनने प्रथमच अस्पर्शित अणुबल सूक्ष्मदर्शी तंत्र (नॉन काँटॅक्ट अॅटॉमिक फोर्स मायक्रोस्कोपी) तंत्राने हायड्रोजनच्या बंधांचे छायाचित्र घेतलेले आहे. चीनच्या नॅशनल सेंटर फॉर नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजी या संस्थेने हा प्रयोग यशस्वी केला होता.
हायड्रोजन बंधांचा अभ्यास 1850 पासून सुरू झाला होता व आतापर्यंत ते नेमके कसे दिसतात हे माहीत नव्हते, त्यामुळे हायड्रोजन बंधाचे हे वेगळ्या तंत्राच्या मदतीने घेतलेले छायाचित्र महत्त्वाचे आहे. एनसीएनएसटी या संस्थेच्या वैज्ञानिकांनी नॉन काँटॅक्ट एएफएम यंत्रात पाच वर्षे सुधारणा करून हे छायाचित्र मिळवले आहे, त्यामुळे बंध कोन व लांबी यांचे मापन शक्य होणार आहे. हायड्रोजनचे बंध हे निसर्गातील सर्वात महत्त्वाचा असा हायड्रोजन रेणू तयार करीत असतात. आपल्या शरीरातील डीएनएचे दुहेरी सर्पिलाकार असलेले दोन धागे एकत्र ठेवण्याचे काम हायड्रोजन बंधामुळे होत असते. अनेक विकरे ही त्यांच्या प्रक्रियांमध्ये उत्प्रेरक म्हणून हायड्रोजन बंधाचा वापर करीत असतात. ‘यापूर्वी आपण अवकाशातून पाहिले तर माणसांची एक रांग दिसत असते, तर आता ते एकमेकांत हात गुंफून उभे असल्याचे दिसत आहे, असे हवे तर म्हणता येईल’ असे क्वियू झियोहुई यांनी सांगितले. आंतररेणवीय रासायनिक क्रियांच्या अभ्यासात या हायड्रोजन बंधांचा मोठा उपयोग होणार आहे. हायड्रोजन बंधाच्या अचूक मापनाने औषधनिर्माण व पदार्थ विज्ञानातही मोठी क्रांती होणार आहे. अमेरिकेतील ‘सायन्स’ या नियतकालिकाने याबाबत माहिती प्रसिद्ध झालेली आहे.