Freeze a ‘Necklace’ of Atoms | भौतिकशास्त्रज्ञांनी गोठवले अणूंचे ‘नेकलेस’ 
विश्वसंचार

Freeze a ‘Necklace’ of Atoms | भौतिकशास्त्रज्ञांनी गोठवले अणूंचे ‘नेकलेस’

पुढारी वृत्तसेवा

लंडन : भौतिकशास्त्रज्ञांनी आता एका प्रयोगात अणूंचे ‘नेकलेस’ गोठवले आहे. या अतिथंड अणूंच्या ‘नेकलेस’ (माळेसारख्या रचनेने) तब्बल १०० वर्षे जुन्या क्वांटम सिद्धांताला पुष्टी देणारे नवीन पुरावे दिले आहेत.

१९३१ मध्ये, भौतिकशास्त्रज्ञ क्वांटम मेकॅनिक्सचा वापर करून काही पदार्थ चुंबकीय का असतात, हे समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी हॅन्स बेथे नावाच्या एका तरुण भौतिकशास्त्रज्ञाने इलेक्ट्रॉन्सच्या एकाच रांगेचा अभ्यास केला. प्रत्येक इलेक्ट्रॉनचे स्पिन (भ्रमण) वर किंवा खाली असू शकते. अशा रांगेचे वर्तन कसे होते याचे गणितीय समीकरण बेथे यांनी मांडले. त्यांनी शोधले की, जर रांगेतील काही स्पिन उलटले, तर ते एकत्र येऊन एकाच युनिटच्या रूपात रांगेत पुढे जाऊ शकतात. दशकांनंतर, भौतिकशास्त्रज्ञांना असे दिसून आले की, बेथे यांची ही पद्धत अणूंसारख्या रेषेत हालचाल करणाऱ्या मोठ्या कणसांमधेही लागू होते. जर ते कण एकमेकांकडे आकर्षित झाले, तर गणितानुसार ते एकत्र येऊन ‘बेथे स्ट्रिंग्ज’ नावाचे पुंज तयार करतील.

आता भौतिकशास्त्रज्ञांना अतिथंड अणूंच्या रांगेत या पुंजकांचे पुरावे सापडले आहेत. २९ ऑगस्ट रोजी ‘नेचर कम्युनिकेशन’ या नियतकालिकात हे संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे. या शोधामुळे कदाचित नवीन गॅजेटस्‌ तयार होणार नाहीत, परंतु यामुळे भौतिकशास्त्रातील एक मूलभूत रहस्य उलगडण्यास मदत झाली आहे. आपल्या सभोवतालचे सर्वकाही, मग ते चुंबक असो वा फोनचे चिप्स, असंख्य परस्परसंवादी कणांचे बनलेले असते. यामुळे त्यांचे वर्तन अंदाज वर्तवणे कठीण होते. अतिथंड अणू या गुंतागुंतीच्या प्रणालींचा अभ्यास करण्याचा एक स्पष्ट आणि सुलभ मार्ग उपलब्ध करून देतात.

संशोधकांनी यापूर्वी चुंबकीय स्फटीक आणि सुपरकंडक्टिंग क्वांटम सर्किटस्‌मध्ये लहान ‘बेथे स्ट्रिंग्स’ पाहिले होते; परंतु त्या प्रयोगांमध्ये एकावेळी एकच स्ट्रिंग कॅप्चर केली गेली होती. सिद्धांतानुसार, अनेक आकारांमधील स्ट्रिंग्जचा समूह संपूर्ण प्रणालीचे वर्तन बदलू शकतो आणि या कल्पनेचा अभ्यास करण्यासाठी एकाचवेळी अनेक स्ट्रिंग्ज तयार करणे आवश्यक होते. अणूंच्या बाबतीत हे करणे कठीण होते, कारण एकमेकांना आकर्षित करणारे अणू सहसा एकत्र येऊन एका गोळ्यात कोलमडतात. परंतु यावेळी या संशोधक संघाने एकाचवेळी विविध आकारांच्या अनेक स्ट्रिंग्ज तयार केल्या आहेत, ज्यामध्ये सहापेक्षा जास्त अणू असलेल्या स्ट्रिंग्जचाही समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT