Most Accurate Atomic Clock | भौतिकशास्त्रज्ञांनी बनवले सर्वात अचूक ‘अणू घड्याळ’  
विश्वसंचार

Most Accurate Atomic Clock | भौतिकशास्त्रज्ञांनी बनवले सर्वात अचूक ‘अणू घड्याळ’

सेकंदाच्या व्याख्येत होऊ शकतो बदल

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : वैज्ञानिकांनी आतापर्यंतचे सर्वात अचूक आणि सूक्ष्म वेळ मोजणारे अणू घड्याळ (Atomic clock) तयार केले आहे. या शोधामुळे वेळेचे सर्वात लहान एकक असलेल्या ‘सेकंदा’ची मूळ व्याख्या बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संशोधकांनी नुकतेच हे विक्रमी घड्याळ सादर केले असून, यामध्ये प्रत्येक मायक्रोसेकंद अत्यंत अचूकतेने मोजण्यासाठी ‘लुतेतियम’ (Lutetium) नावाच्या मौलिकाच्या (Element) अणूंच्या कंपनांचा वापर केला जातो. हे घड्याळ दशांश चिन्हानंतर १९ स्थळांपर्यंत (१९ decimal places) अचूक वेळ दाखवते - जे यापूर्वीच्या सर्वात अचूक घड्याळाच्या तुलनेत ४१ टक्क्यांनी अधिक प्रगत आहे. हे संशोधन २३ सप्टेंबर रोजी ‘नेचर’ या प्रसिद्ध सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. अणू घड्याळांचा शोध १९५० च्या दशकात लागला होता. सुरुवातीची अणू घड्याळे ‘सिशिअम’ (Cesium) या चंदेरी धातूच्या रेडिओॲक्टिव्ह आयसोटोप्सचा वापर करून बनवली गेली होती.

वेळेच्या अचूक मोजमापासाठी सिशिअम हा धातू मानक (Gold standard) मानला गेला. ‘इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजर्स’ने (BIPM) १९६८ मध्ये सिशिअम-१३३ (Cesium-133) मधून उत्सर्जित होणाऱ्या प्रारणांवर आधारित ‘सेकंदा’ची नवी व्याख्या निश्चित केली. अधिकृत व्याख्येनुसार, सिशिअम-१३३ अणूच्या ९.१९ अब्ज कंपनांचा (Vibrating) वेळ म्हणजे एक सेकंद होय. (यापूर्वी, १९०० मधील एका सौर वर्षाच्या १/३१,५५६,९२५ व्या भागाला एक सेकंद मानले जात असे.) सिशिअमच्या घड्याळांमुळे सेकंदाचे मोजमाप प्रमाणित होण्यास मदत झाली, ज्याचा वैज्ञानिक आणि दैनंदिन कामकाजात मोठा फायदा झाला.

१९६० च्या दशकानंतर ‘इतरबियम’ (Ytterbium) आणि ‘स्ट्रॉन्शियम’ (Strontium) यांसारख्या इतर रेडिओॲक्टिव्ह धातूंचाही अणू घड्याळांमध्ये वापर सुरू झाला. आजच्या काळात जीपीएस (GPS), इंटरनेट आणि लष्करी तंत्रज्ञानासाठी ही अणू घड्याळे अत्यंत महत्त्वाची ठरत आहेत. मात्र, आधुनिक आणि अती-अचूक अणू घड्याळांनाही काही मर्यादा आहेत. उदाहरणार्थ, तापमान, चुंबकीय क्षेत्र आणि गुरुत्वाकर्षण यांतील अतिसूक्ष्म बदलांचाही त्यांच्या अचूकतेवर परिणाम होतो. नवीन संशोधनानुसार, लुतेतियमचा वापर करून बनवलेले हे नवीन घड्याळ या सर्व अडचणींवर मोठ्या प्रमाणावर मात करते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT