Wildlife Photographer of the Year | ‘या’ छायाचित्राला मिळाला प्रतिष्ठित पुरस्कार 
विश्वसंचार

Wildlife Photographer of the Year | ‘या’ छायाचित्राला मिळाला प्रतिष्ठित पुरस्कार

पुढारी वृत्तसेवा

लंडनः या वर्षीच्या ‘वाईल्डलाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर’ पीपल्स चॉईस अ‍ॅवॉर्डसाठी नामांकित झालेले 24 फोटो लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. वाईल्डलाईफ फोटोग्राफी आणि निसर्गाची आवड असणार्‍या जगभरातील चाहत्यांनी या स्पर्धेत त्यांचं मत नोंदवलं. या स्पर्धेसाठी तब्बल 85 हजार 917 लोकांनी मतदान केलं आहे. एका खेळकर आयबेरियन लिंक्सच्या फोटोला यावर्षीचा ‘वाईल्डलाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर पीपल्स चॉईस अ‍ॅवॉर्ड 2026’ पुरस्कार मिळाला आहे.

लिंक्स हा प्राणी मांजराच्या प्रजातीतील असून, तो बिबळ्यापेक्षा लहान आणि रानमांजरापेक्षा मोठा असतो. अमेरिका आणि युरोपच्या उत्तर समशीतोष्ण प्रदेशात आणि आशियाच्या उत्तर व मध्य भागांत हे प्राणी आढळतात. ऑस्ट्रियाचे फोटोग्राफर जोसेफ स्टेफान यांनी हा फोटो काढला आहे. ‘फ्लाईंग रोडन्ट’ हे या फोटोचं नाव आहे. स्पेनच्या सियुदाद रिअल प्रांतात दोन आठवडे राहून हा फोटो त्यांनी काढला आहे.

हा फोटो काढण्यासाठी ते अनेक दिवस एका जागी लपून प्रयत्न करत होते. त्या दरम्यान एके दिवशी एक तरुण लिंक्स प्राणी अचानक तिथे त्याची शिकार घेऊन आला आणि त्याने ती शिकार हवेत फेकत झेलण्यास सुरुवात केली. जोसेफ स्टेफान म्हणाले, ‘तो लिंक्स सुमारे 20 मिनिटं त्याच्या शिकारीसोबत खेळण्यात मश्गुल होता. कधी कधी तो मागच्या दोन्ही पायांवर उभा राहून त्या शिकारीकडे नजर रोखून बघायचा. मला त्या लिंक्सचा खेळ बघून असं वाटलं की आता ‘तो उंदीर (रोडन्ट) आता उडायलाच लागेल.’

काही वेळाने त्या लिंक्सचा या खेळातला रस संपला आणि तो त्याची शिकार घेऊन झुडपात खायला निघून गेला. आयबेरियन लिंक्स ही जगातील सर्वात दुर्मीळ वन्य मांजरांपैकी एक प्रजात आहे आणि 2000च्या दशकाच्या सुरुवातीला, 100 पेक्षाही कमी लिंक्स शिल्लक राहिले होते. त्यामुळे ही प्रजात नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली होती. दीर्घकालीन संवर्धन आणि पुनर्वसनाच्या प्रयत्नांमुळे, या प्रजातीची संख्या वाढली. आता 2 हजारांहून अधिक आयबेरियन लिंक्स आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT