Pesticides cancer risk | कीटकनाशकांमुळे कर्करोगाचा धोका 150 टक्क्यांनी वाढतोय 
विश्वसंचार

Pesticides cancer risk | कीटकनाशकांमुळे कर्करोगाचा धोका 150 टक्क्यांनी वाढतोय

पुढारी वृत्तसेवा

लिमा : आजच्या युगात आपण जो श्वास घेतो, जे पाणी पितो आणि जे अन्न खातो, त्या सर्व गोष्टींमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचे रसायन मिसळलेले असते. विशेषतः, शेतीमध्ये पिकांचे कीड आणि रोगांपासून संरक्षण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कीटकनाशकांचा (पेस्टीसाईडस्) वापर केला जातो. मात्र, हीच कीटकनाशके आता मानवी आरोग्यासाठी कर्करोगापेक्षाही भयंकर ठरत असल्याचा खुलासा एका ताज्या संशोधनातून झाला आहे.

‘जर्नल नेचर हेल्थ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, ज्या भागात कीटकनाशकांचा अतिवापर केला जातो, तेथे राहणार्‍या लोकांमध्ये कर्करोगाचा धोका 150 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. हे संशोधन प्रामुख्याने दक्षिण अमेरिकेतील पेरू या देशात करण्यात आले, जिथे ग्रामीण आणि आदिवासी समुदायांवर कीटकनाशकांचा सर्वाधिक घातक परिणाम पाहायला मिळाला. शास्त्रज्ञांनी या संशोधनासाठी खालील बाबींचा अभ्यास केला : सामान्यतः वापरल्या जाणार्‍या 31 प्रकारच्या कीटकनाशकांचा सखोल अभ्यास करण्यात आला.

2014 ते 2019 या कालावधीत कीटकनाशकांचा प्रसार आणि वापराचा आढावा घेतला गेला. 2007 ते 2020 या कालावधीतील 1.5 लाखांहून अधिक कर्करोग रुग्णांच्या डेटाची तुलना करण्यात आली. ज्या भागात कीटकनाशकांचे प्रमाण जास्त होते, तिथे कर्करोगाचे रुग्णही मोठ्या संख्येने आढळले. कीटकनाशके शरीरात गेल्यावर ती त्वरित परिणाम दाखवत नाहीत, तर ती ‘हळूहळू’ कार्य करतात :

1. पेशींचे कार्य विस्कळीत करणे : हे रसायन शरीरातील पेशींच्या सामान्य कार्यात अडथळा निर्माण करते. 2. रोगप्रतिकारशक्ती : यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. 3. यकृतावर परिणाम : कीटकनाशकांचा सर्वाधिक वाईट परिणाम यकृतावर दिसून येतो. शेतीसाठी अनिवार्य मानली जाणारी ही कीटकनाशके आता मानवाच्या मुळावर उठली आहेत. अन्नाद्वारे ही रसायने थेट आपल्या शरीरात प्रवेश करत असल्याने ग्रामीण भागासह शहरी भागातही कर्करोगाचा धोका वाढल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT