वॉशिंग्टन : शेतीत वापरल्या जाणाऱ्या ‘निओनिकोटिनॉइडस्’ नावाच्या कीटकनाशकामुळे पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता वेगाने कमी होत असल्याचे नवीन अभ्यासातून समोर आले आहे. प्रयोगशाळेतील नर उंदरांवर केलेल्या चाचण्यांमध्ये या रसायनांमुळे स्पर्म काऊंट, त्यांची हालचाल आणि रचना खराब झाल्याचे आढळले. मानवांवरही असाच परिणाम होण्याची शक्यता खूप जास्त असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
‘एन्व्हायर्नमेंटल रिसर्च’ जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या पुनरावलोकनात 2005 ते 2025 या कालावधीतील 21 प्रयोगांचा अभ्यास केला. यात निओनिकोटिनॉइडस्च्या संपर्कात आलेल्या प्राण्यांमध्ये वृषणांचे ऊतक (टेस्टिक्युलर टिश्यू) खराब झाले, हार्मोन्सचा तोल बिघडला आणि शुक्राणूंचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले, असे शास्त्रज्ञांना दिसून आले. ही कीटकनाशके झाडाच्या मुळापासून पानापर्यंत पूर्णपणे शोषली जातात. त्यामुळे फळे-भाज्या कितीही धुतल्या तरी त्यांचे अवशेष राहतात. 50 टक्क्यांहून अधिक लोकांच्या शरीरात आणि मुलांमध्ये तर आणखी जास्त प्रमाणात या रसायनांचे कण सापडले, असे अमेरिकेतील सर्वेक्षणात आढळले.
म्हणजे आपण रोज जे खातो त्यातून हे विषारी पदार्थ आपल्या शरीरात जातात, असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला. ऑक्सिडेटिव्ह तणाव वाढून शुक्राणूंच्या पेशी आणि त्यांचे डीएनए खराब होते. पुरुष हार्मोन्सचे सिग्नलिंग बिघडते आणि वृषणांचे ऊतक नष्ट होतात, असा निष्कर्ष संशोधनातून निघाला. परिणामी, स्पर्म काऊंट आणि त्यांची गतिशीलता कमी होते, प्रजनन क्षमता घटते, असे यात पुढे म्हटले आहे. ‘हे संशोधन फक्त प्राण्यांपुरते मर्यादित नाही. सर्व सस्तन प्राण्यांमध्ये शुक्राणू बनण्याची प्रक्रिया सारखीच असल्याने मानवांवरही हा धोका आहे, अन्नातील कीटकनाशकांचे अवशेष हळूहळू पुरुषांची प्रजनन शक्ती कमी करत आहेत,’ असे प्रमुख संशोधिका सुमैया इरफान आणि वेरोनिका सांचेझ यांनी सांगितले. त्यामुळे आता कीटकनाशकांचा वापर कमी करणे आणि सेंद्रिय शेतीकडे वळणे यांची गरज अधोरेखित झाली आहे.